मुंबई - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि ज्येष्ठ नेते र.ग. कर्णिक यांचे निधन झाले. वांद्रे येथील निवासस्थानी वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सन 1970 व 1977 अनुक्रमे 37 व 54 दिवसांचे दोन मोठे कर्मचारी संप कर्णिक यांच्या नेतृत्वात झाले. कर्णिक यांच्या नेतृत्वामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. कर्णिक यांच्या निधनानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी शोक व्यक करत, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचीही आठवण अनेकांनी शेअर केली आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे हृदय स्थान असलेले माननीय श्री. र ग कर्णिक यांची प्राणज्योत नुकतीच काही वेळापूर्वी मालवली. अत्यंत दुःखद असणारी ही बातमी मला आपल्यापर्यंत पोचवावी लागत आहे. मध्यवर्ती संघटनेच्या इतिहासात ज्यांचे नाव अमर राहील. त्यांनी आज आपल्या सर्वांचा निरोप घेतला आहे. परमेश्वर मृताचे आत्म्यास चिरशांती देवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कर्णिक साहेब, अमर रहे! अशी प्रतिक्रिया राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणी यांनी दिली आहे.
खरोखरच त्या कठीण काळात जेंव्हा सोशल मिडिया नव्हता इंटरनेट नव्हते वाहतुकीच्या सुविधा पुरेशा नव्हत्या हक्कांबाबत अवेरनेस कमी होता वेतन कमी होते शासनाची पकड / वरिष्ठांचा दरारा पक्का होता अशा परिस्थितीतही संघटनेचे सारथ्य कुशलतेने केले. संघटनेची ताकत शासनास जाणवुन दिली व त्यामुळे वेतन आयोग केंद्राप्रमाणे लागू करणेचा असो अगर अन्य मुद्दे असोत मार्गी लागले संघटनेच्या मागण्यांची दखल घेणे आवश्यक असल्याचे शासनाच्या प्रत्ययास आले, अशा या कालावधीपासून किंवा त्यापूर्वी पासूनही ज्यांनी कर्मचारी संघटनेची बांधणी केले, नेतृत्व केले, जबाबदारी स्विकारली व निभावलीही अस एक खंबीर, निस्पृह, संयमी, लढाऊ, सर्वसमावेषक, जबाबदार, कुशल नेतृत्व म्हणजे मा. र. ग. कर्णिक सर अशा या नेत्याला परमेश्वराने त्याच्या राज्यात बोलावून घेतले. पण, या पृथ्वीवरील राज्यातून ते आज गेले असले तरी त्यांच कतृत्व व कार्य अजरामर असच आहे व त्यांची आठवण सदैव राहील. किंबहुना कर्मचारी संघटनांचा इतिहास लिहताना त्यांचे स्थान अग्रणी राहील, अशी पोस्ट एका कर्मचाऱ्याने त्यांना श्रद्धांजली वाहताना शेअर केली आहे.