मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष अद्यापही कायम आहे. अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत, शिंदे गटात प्रवेश करत आहेत. उद्धव ठाकरे राज्यातील काही ठिकाणी दौरे करत असले, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ताकद वाढताना दिसत आहे. त्यातच, खा. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी मोठा दावा केला. सुनील राऊत यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलीय. मात्र, आता त्यांच्या ह्या दाव्यावर भाजपाकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
मला शंभर कोटींची ऑफर होती आणि आज सुद्धा ऑफर आहे. कारण मी स्वतः आमदार आहेच. पण, माझा ब्रँड संजय राऊत माझ्यामागे असल्यामुळे मला शंभर कोटींची ऑफर आहे. अशा कितीही ऑफर आल्या तरी आम्ही आमचा विचार बदलणार नाही. शंभर कोटी घेऊन माझ्यासारखा निष्ठावंत शिवसैनिक बदलणार नाही, असा दावा सुनील राऊत यांनी केला. त्यावर, आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी पलटवार केला आहे. त्यांना कोणी १०० रुपयांचीही ऑफर देणार नसल्याचे राणेंनी म्हटले.
सुनील राऊत यांनी केलेल्या विधानावर आता भाजपाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सुनील राऊत यांना कुठलीही ऑफर नसल्याचे म्हटले. सुनील राऊत यांनी काही शुन्य जास्त लावले, त्यांना कोणी १०० रुपयेही देणार नाही. संजय राऊत तुरुंगात असताना हेच सुनील राऊत अमित शहांच्या दिल्लीतील घराबाहेर ४ तास उभे होते. भाजपाच्या मुख्यालयाच्या बाहेर जाऊन ४ तास थांबलेले होते. काही करा, आम्ही भाजपात यायला तयार आहोत, पण आम्हाला बाहेर काढा, अशी विनवणी करत असल्याचा गौप्यस्फोट नितेश राणेंनी केला आहे.
आम्ही गुडघे टेकले नाहीत
शिवसैनिकांना संबोधित करताना सुनील राऊत म्हणाले की, संजय राऊत यांनी भाजपसमोर जर गुडघे टेकले असते. तर ते साडेचार महिने जेलमध्ये गेले नसते. पण त्यांना ते कधीही मान्य नव्हते. ते जेलमध्ये असतानाचे त साडेचार महिने माझ्या घरच्यांनी कसे काढले हे फक्त आम्हालाच माहिती आहे. सगळे काही सहन केले परंतु आम्ही पक्ष सोडला नाही. सोडणारही नाही, असे सुनील राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.