नवाब मलिक राष्ट्रवादीतील कोणत्या गटासोबत आहेत? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 01:12 PM2023-12-08T13:12:02+5:302023-12-08T13:16:27+5:30
कालपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. पहिलाच दिवस आमदार नवाब मलिक यांच्यावरुन गाजला.
मुंबई- कालपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. पहिलाच दिवस आमदार नवाब मलिक यांच्यावरुन गाजला. नवाब मलिक कोणत्या बाजूच्या बाकावर बसणार यावरुन जोरदार चर्चा सुरू होती. आमदार मलिक काल सत्ताधारी बाकावर बसले होते, यावरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून नाराजीही व्यक्त केली. यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या एंट्रीने अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला. भाजपने आधी नवाब मलिक यांच्यावर आरोप केले आता त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी टीका विरोधकांनी सुरू केली होती. आता खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आमदार नवाब मलिक यांच्यासोबत राजकीय कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मलिक यांच्यासोबतची भेट ही फक्त तब्येतीच्या विचारपूससाठी होती असंही पटेल म्हणाले.
खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, नवाब मलिक आमचे जुने आणि ज्येष्ठ सहकारी राहिले आहेत, मधल्या काळी त्यांच्यावर आरोप झाले होते त्याकाळात राष्ट्रवादीतही अनेक घडामोडी घडल्या. त्या घडामोडीवेळी नवाब मलिक कोणासोबतही नव्हते. त्यांचा कोणताही संबंध आला नाही. त्यांना मेडिकल जामीन मंजूर झाल्यानंतर आम्ही तब्येतची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटलो. ते आमचे कर्तव्य होतं. ते सध्या आमदार आहेत, ते इथे विधानसभेत आल्यानंतर जुने सहकारी एकमेकांना भेटले, बोलतात ते स्वभाविक आहे. आम्ही सध्या त्यांच्यासोबत राजकीय चर्चा केलेली नाही. ते कोणासोबत आहेत, त्यांची भूमिका काय आहे. कारण ते मेडिकल बेलवर आहेत म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली नाही. आम्हाला त्यांच्याशी याबाबत चर्चा करायची नाही, असं स्पष्टीकरण खासदार पटेल यांनी दिले.
"आता राहिला प्रश्न विधानसभेत ते कुठे बसले याचा अधिकार त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ते विधानसभेत आले. आता आल्यानंतर ते कोणाला भेटल्यानंतर आम्ही त्यांना पुरस्कृत करणं म्हणणं की दुसरे पुरस्कृत करतात हे म्हणणं ही दिशाभूल करणारी गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना पत्र लिहिलं असेल त्याचा दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही. आम्ही आता नवाब भाई आमच्याकडे आहेत की नाहीत हा प्रश्नच निर्माण केलेला नाही, असंही ते म्हणाले.
खासदार पटेल म्हणाले, जी व्यक्ती मेडिकल बेलवर आहेत, तेब्येत त्यांची खालावली होती. त्यावेळी आम्ही त्यांच्या तब्येतीच्या विचारपूससाठी भेट घेतली होती. मी पण भेट घेतली होती, समोरच्यांनी पण घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवाब मलिक यांची आज आणि उद्या काय भूमिका असणार आहे याच्यावर मी भाष्य करु इच्छित नाही. आम्ही त्यांना अडचणीत टाकू इच्छित नाही.
विरोधकांकडून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न
'विरोधकांकडून कालपासून उगीचच गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधक निवडणूक हरल्यामुळे असे मुद्दे बाहेर काढत आहेत, असा आरोपही खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला.