Join us

एका क्षणात होत्याचे नव्हते झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 1:34 AM

डोंगरी भागात एकमेकांना जोडून इमारती उभारलेल्या आहेत.

मुंबई : डोंगरी भागात एकमेकांना जोडून इमारती उभारलेल्या आहेत. यामध्ये मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास चारमजली केसरबाई ही इमारत कोसळली आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाले, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.इमारतीच्या ढिगाऱ्याखाली रहिवासी दबले गेले. त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी तत्काळ ढिगारा बाजूला काढण्याचे काम सुरू केले. यासह अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पालिकेचे आपत्कालीन पथक पोहोचून ढिगाºयातून सापडलेल्या जखमींना रुग्णालयात हलविले. एनडीआरएफचे पथक येऊन त्यांनी आपल्या गतीने कामे सुरू करण्यास सुरुवात केली. मात्र, चिंचोळ्या गल्लीत इमारत असल्याने आणि इतर पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने जवानांना आपले काम करताना अनेक अडचणी आल्या.बाहेरील निशानपाडा क्रॉस रोडवर रुग्णवाहिका, पालिकेच्या आपत्कालीन पथकांच्या गाड्या, अग्निशमन गाड्या एका मागे एक उभ्या होत्या. त्यानंतर, छोट्या आकाराचा जेसीबी आणून याद्वारे ढिगारा बाजूला काढण्याचे काम सुरू केले.इमारतीमध्ये माझा एक मित्र राहत होता. मात्र, त्याचा आता काही पत्ताच नाही. त्याच्या घरात त्याची वहिनी गरोदर होती. मात्र, ती आणि मित्राचे वडील आदल्याच दिवशी तिच्या माहेरी गेले. त्यामुळे ते बचाविले. मात्र, मित्राला शोधण्यात येत आहे, असे स्थानिक रहिवाशाने सांगितले.घडलेल्या घटनेच्या ठिकाणी मदतकार्य करण्यासाठी १० ते १५ तरुण मुले गोळा झाली. यासह एका सामाजिक संस्थेकडून मदत कार्य केले जात होते.घटनास्थळी मदतकार्य करणाऱ्यांना खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्या देण्यात येत होत्या. कोसळलेल्या इमारतीच्या बाजूच्या इमारतीमधील रहिवाशांना नजीकच्या शाळा, जमातखाना येथे नेण्यात आले.

टॅग्स :इमारत दुर्घटना