मुंबई : ‘ओएलएक्स’वर मोबाइल विक्रीची जाहिरात टाकणे मुलुंडमधील तरुणाला भलतेच महागात पडले. मोबाइलची ही जाहिरात पाहून मोबाइल खरेदीसाठी आलेल्या दुकलीने तरुणालाच गंडा घातल्याची घटना बुधवारी मुलुंडमध्ये घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुलुंड पश्चिमेकडील जे.एन. रोड परिसरात महेश गोर (४०) कुटुंबीयांसोबत राहतात. वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये ते दलालीचा व्यवसाय करतात. १५ दिवसांपूर्वी त्यांच्याकडील आयफोन ६ प्लस विकण्याबाबत त्यांनी ‘ओएलएक्स’वर जाहिरात टाकली. बुधवारी ही जाहिरात पाहून एका दुकलीने त्यांना संपर्क साधत मुलुंड निर्मल लाइफ स्टाईल येथे बोलावले. मोबाइल पसंत पडल्याचे सांगून ५० हजारांवर मोबाइलचा व्यवहार ठरला. व्यवहार सुरू असतानाच दुकलीने गोर यांच्या हातातील मोबाइल हिसकावून सोबत आणलेल्या कारने पळ काढला. गोर यांनी दोघांचा पाठलाग केला. मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. याबाबत तत्काळ मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात आरोपींचे मोबाइल लोकेशन डोंगरी असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी डोंगरी परिसरात धाव घेतली असता, तेथे आरोपींची कार पोलिसांच्या हाती लागली. गुन्ह्यात वापरलेली कारदेखील चोरीची असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
आॅनलाइन मोबाइल विक्री आली अंगलट
By admin | Published: January 09, 2016 2:32 AM