अंगावर काटा आला... पंकजांसमोर वाचलेल्या पत्राची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 06:05 PM2020-12-27T18:05:40+5:302020-12-27T18:06:20+5:30
चला-हवा-येऊ- द्या कार्यक्रमात भाजपा नेत्या पंकजा मुंडें, खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी एंट्री केली होती. यावेळी, विविध राजकीय विनोदानंतर कार्यक्रमाचा शेवट भावूक वातावरणात पार पडला.
मुंबई - चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे, दोन भाजपा नेते आणि एक राष्ट्रवादीचे पवार अशी बैठक जमली होती. या कार्यक्रमात राजकीय विनोदाच्या जुगलबंदीनंतर कार्यक्रमाचा शेवट लेखक अरविंद जगताप यांच्या एका पत्राद्वारे झाला. राज्यातील ऊसतोड कामगारांच्या आयुष्याची व्यथा आणि कथा या पत्रातून ऊसतोड कामगारांच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर मांडण्यात आली होती. यावेळी, सर्वचजण भावूक झाल्याचं दिसून आलं. आता, या पत्राची दखल सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी घेतली आहे.
चला-हवा-येऊ- द्या कार्यक्रमात भाजपा नेत्या पंकजा मुंडें, खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी एंट्री केली होती. यावेळी, विविध राजकीय विनोदानंतर कार्यक्रमाचा शेवट भावूक वातावरणात पार पडला. शेवटच्याक्षणी ऊसतोड कामगार, त्यांची मुलं आणि त्यांचे भविष्य या संदर्भात लिहिलेले पत्र सन्माननीय पंकजा मुंडे, रोहित पवार आणि सुजय विखे पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत सागर कारंडे यांनी वाचले आणि ते महाराष्ट्रभर खूप गाजलं. त्यानंतर राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी लेखक अरविंद जगताप यांना एक पत्र लिहलं आहे. त्यामध्ये, ऊसतोड कामगारांच्या संदर्भातील पत्र वाचून अंगावर काटा आला, माझे वडीलही ऊसतोड कामगार होते, असे मुंडेंनी सांगितलं.
पुढे लिहिताना मुंडे म्हणतात की, काबाडकष्ट करणाऱ्या ऊसतोड कामगारांना त्यांच्या लेकरांच्या नशिबी हीच पाचाट आणि कोयता द्यावा लागतो. त्यांचं हेच भविष्य सुधारण्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभारलेलं महामंडळ आता मी आपल्या खात्यात मागून घेतलं आहे. राबणाऱ्या आपल्या या आया, बहिणींसाठी एक विशेष सहाय्य योजना आखायची आहे. या कामगारांना हक्काचं काम मिळावं म्हणून रोजगार हमी योजनेसारखी काम हाती घेण्याचा प्रयत्न आहे. या सर्व कामगारांच्या सुरक्षा आणि लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी मी शब्दबद्ध आहे, असं धनंजय मुंडेंनी उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. तसेच, ऊसतोड कामगारांसाठी त्यांनी घेतलेल्या या प्रयत्नांची दखल अरविंद जगताप यांनी घेऊन या संदर्भात एक पत्र भविष्यात लिहावं, अशी इच्छाही धनंजय मुंडेंनी व्यक्त केली आहे.