मुंबई : मेट्रो-४ मार्गिकेचा विस्तार दक्षिण मुंबईतील जीपीओपर्यंत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विस्तारित मार्गिकेबाबत एमएमआरडीए आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यामधील खर्चाबाबतची यशस्वी बोलणी झाली असून या मार्गातील अडथळे आता दूर झाले आहेत. एमएमआरडीएला मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे खर्चाच्या किमतीइतका भूखंड देण्याचे तत्त्वत: मान्य झाले आहे.वडाळा - घाटकोपर - ठाणे-कासारवडावली या ३२.३ किमी मेट्रो-४ मार्गाच्या कामाला सध्या गती आली आहे. या मार्गिकेचा वडाळा येथून जीपीओपर्यंत १२.७ किमीपर्यंत विस्तार करण्याचा एमएमआरडीए प्राधिकरणाचा प्रस्ताव होता, मात्र या विस्तारित मार्गिकेचा खर्च कुणी करायचा यावरून वाद होता.वडाळा ते जीपीओपर्यंतच्या या टप्प्यामध्ये अनेक हेरिटेज वास्तू असल्याने या भागातील विस्तार भूमिगत असावा, असे एमएमआरडीएचे म्हणणे होते. मात्र उन्नत मार्गाच्या तुलनेत भूमिगत मार्गासाठी खर्च तिप्पट असल्याने वाढीव खर्चाचा मुद्दाही कळीचा बनला होता.वडाळा ते जीपीओपर्यंतचा टप्पा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीत येतो. या भागातून मेट्रो मार्गिका गेल्यास पोर्ट ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनाही फायदा होणार आहे. यामुळे या टप्प्यातील खर्च हा पोर्ट ट्रस्टने करावा, अशी एमएमआरडीएची मागणी होती. सध्या पूर्व किनारपट्टीवर आमचे अनेक प्रकल्प असल्याने आम्हालाच निधीची गरज असल्याने पैसे देणे शक्य नसल्याचे पोर्ट ट्रस्टचे म्हणणे होते.या संदर्भात उच्चस्तरावर बोलणी यशस्वी ठरल्याने विस्ताराच्या मार्गातील अडथळा आता दूर झाला आहे. या मार्गातील भुयारी आणि उन्नत मेट्रोच्या खर्चाच्या फरकाच्या किमतीचा भूखंड मुंबई पोर्ट ट्रस्टमार्फत दिली जाणार आहे. याबाबत तत्त्वत: निर्णय झाला असल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी सांगितले.या मार्गिकेचा वडाळा येथून जीपीओपर्यंत १२.७ किमीपर्यंत विस्तार करण्याचाच प्राधिकरणाचा प्रस्ताव होता.
मेट्रो-४ चा विस्तार जीपीओपर्यंत करण्याचा मार्ग झाला मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:47 AM