मुंबई : पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात सोमवारी ७१ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचा मेंदूमृत झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे अवयवांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तीन जणांना जीवनदान मिळाले आहे. या अवयवदानातून यकृत आणि दोन किडन्या दान करण्यात आल्या. हे मुंबई विभागातील ४७ वे मेंदूमृत अवयदान आहे. या ४७ अवयवदानातून १३५ रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.
गेल्या वर्षी मुंबई विभागात एकूण ४७ मेंदूमृत अवयवदान झाले होते, तो आकडा वर्ष संपायला १७ दिवस बाकी असताना गाठला आहे. आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान मोठ्या प्रमाणात होत नाही. त्यासाठी जनजागृतीची गरज असून, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यांची प्रतीक्षा यादी वाढत आहे. एका वर्षाला मेंदूमृत व्यक्तीकडून अवयव दान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक प्रमाणात अवयवदान होईल, असे वाटत आहे. नागरिकांमध्ये अवयवदानाचे महत्त्व दिसून येत आहे. अजून मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. मी आणि समितीचे सरचिटणीस डॉ. भारत शाह मुंबईतील विविध वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन अवयवदानासंबंधी जनजागृती करणारी व्याख्याने घेत असतो.
- डॉ. सुरेंद्र माथूर, अध्यक्ष, मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती.
मुंबई महानगर प्रदेशात मेंदूमृत व्यक्तीकडून मिळणाऱ्या अवयवदानाच्या नियमनाचे काम मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीमार्फत करण्यात येते. त्यांच्याकडे मुंबई विभागातून अवयवांसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांची नोंदणी केलेली असते. त्यानुसार अवयव प्राप्त झाल्यानंतर त्या क्रमवारीने अवयवांचे वाटप करण्यात येते.