एल अँड टीच्या नोकरीच्या अर्जातही माझ्या स्पेलिंगच्या सात चुका झाल्या होत्या- अनिल नाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 10:04 AM2017-09-21T10:04:22+5:302017-09-21T11:44:16+5:30
काम असो वा अभ्यास अपयश, चुका हे त्या प्रक्रियेचेच एक भाग असतात. बहुतांश लोक चुकांना घाबरुन प्रयत्न करायचेच टाळतात मात्र चुकांना सुधारुन पुढे जातात तेच खरे यशस्वी होतात. याचं आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण म्हणजे एलअँडटी कंपनीचे गेली १८ वर्षे अध्यक्ष असणारे अनिल मणिभाई नाईक.
मुंबई, दि.21- काम असो वा अभ्यास अपयश, चुका हे त्या प्रक्रियेचेच एक भाग असतात. बहुतांश लोक चुकांना घाबरुन प्रयत्न करायचेच टाळतात मात्र चुकांना सुधारुन पुढे जातात तेच खरे यशस्वी होतात. याचं आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण म्हणजे एलअँडटी कंपनीचे गेली १८ वर्षे अध्यक्ष असणारे अनिल मणिभाई नाईक. आपल्या आयुष्यातील चढउताराचा, यशापयाशाचा लेखाजोखा सीएनबीसी टीव्ही १८ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मांडला. गेली ५५ वर्षे एलअँटी कंपनीत सेवा बजावणारे नाईक यांनी त्या नोकरीसाठी केलेल्या अर्जातही आपण सातवेळा स्पेलिंग चुकलो होतो, असे विनम्रपणे या मुलाखतीत सांगितले.
नाईक म्हणाले, 'मुलाखतीच्या वेळेसही मला धड बोलता येत नव्हतं तेव्हा मुलाखत घेणारे मॅनेजर तुझं इंग्रजी अधिक चांगलं होऊ शकतं असं वाटत नाही का? असे म्हणाले होते, तेव्हा मी होय असं उत्तर दिलं कारण नोकरीच्या अर्जातही मी स्पेलिंगच्या सात चुका केल्या होत्या.' अनिल नाईक ऑक्टोबर महिन्यात निवृत्त होत आहोत. त्या निमित्ताने त्यांनी या मुलाखतीत एलअँडटीमधील प्रवास उलगडून सांगितला. ते आयआयटीचे विद्यार्थी नसल्याने त्यांना एलअँडटीने मुलाखतीला बोलावलेच नव्हते. एलअँडटीची नोकरी कशी मिळाली याबद्दल बोलताना ते म्हणाले, "एलअँडटी तेव्हा फक्त आयआयटीयन्सना बोलवत असे, म्हणून मला मुलाखतीला बोलावलेच नव्हते. मग मी नेस्टर बॉयलरमध्ये १८ महिने काम केल्यावर या नोकरीसाठी पात्र झालो. अनिल नाईक यांच्या आयुष्याची पहिली काही वर्षे खेड्यात गेल्यामुळे त्यांना मुंबईत आल्यावर इंग्रजी बोलायला भिती वाटे.
'मी एका खेड्यातून आलो, माझं शिक्षण गुजराती माध्यमात झालं. वडिलांनी मला वल्लभ विद्यानगर कॉलेजात जाण्यास सांगितलं तिथे २५% मुले बाहेरची होती तरीही सगळे गुजरातीतच बोलायचे. अशा स्थितीतून मुंबईत आल्यावर लोकांना भेटणं त्यांच्याशी संवाद साधणं मला चांगलंच अवघड गेलं'.
'नोकरीसाठी झालेली मुलाखत आणि ती घेणा-या मॅनेजरचं बोलणं मी चांगलंच मनावर घेतलं. मी सरळ एक डिक्शनरी आणली, कॅसेटस आणल्या, तेव्हा सीडी, डीव्हीडी नव्हत्या, चार वर्षांनी कोठे मी भाषेबाबत समाधानकारक प्रगती करु शकलो' , अशा शब्दांमध्ये इंग्रजी शिकण्याच्या धडपडीबाबत नाईक यांनी सांगितले.
आरशासमोर उभं राहून सराव
कॅसेटस एेकून मी उच्चार शिकलो. मग मी त्यांना माझ्या विचारप्रक्रियेशी ताडून पाहू लागलो. आधी आरशासमोर उभं राहून मी इंग्रजी वाक्य म्हणत असे मग अचूकतेसाठी डिक्शनरीत त्याच्या योग्य अर्थासह व उच्चारासह पाहून पुन्हा सराव करत असे. असा मी तीन चार वर्षे सराव केल्यावर मला इंग्रजीत समाधानकारक प्रगती करता आली.