"चार महिन्यात सत्तांतर होणार, नेतृत्व ठाकरेंकडे जाणार"; संजय राऊतांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 11:30 PM2024-06-12T23:30:16+5:302024-06-12T23:33:20+5:30
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत भाष्य केले.
Sanjay Raut ( Marathi News ) : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर आणि मुंबई पदवीधर मतदारसंघातील निवडणूका जाहीर झाल्या आहेत. सर्व पक्षांनी या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसने या दोन्ही जागांवर अर्ज दाखल केले होते. दरम्यान, आता या जागांचा तिढा सुटला आहे. मुंबई पदवीधरमधून भाजपाचे किरण शेलार आणि मविआचे अनिल परब यांच्यात लढत आहे. येथून शिंदेसेनेच्या दीपक सावंत यांनी अर्ज मागे घेतला आहे. आज ठाकरे गटाचा वांद्रे येथे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली.
यावेळी खासदार संजय राऊत यांनी आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत भाष्य केले. "अमोल कीर्तिकरांना विजयी उमेदवारापेक्षा जास्त टाळ्या मिळाल्या आहेत. आजपर्यंत लढणाऱ्याची चर्चा होते. अमोर कीर्तिकर लढले आहेत, ते पुढची न्यायालयाची लढाई जिंकतील. भाजपाचे राज्य या राज्यात आल्यापासून राज्यात भ्रष्टाचार सुरू झाला आहे. हे पाप संपवण्याचं काम शिवसेनेच्या शिलेदाराची जबाबदारी आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
"आता आपण सगळ्यांनी जिद्दीने लढले पाहिजे. लोकसभा निवडणूक आपण जिद्दीने लढलो, सारा देश आपल्याकडे नजरा लावून होता. सगळे म्हणत होते शिवसेनेला दोन जागाही जिंकता येणार नाहीत, याच उद्धव साहेबांनी नरेंद्र मोदींचा रथ रोकला आहे, मोदी काँग्रेस मुक्त भारत करायला गेली पण साहेबांनी बहुमत मुक्त भाजपा केली, असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपाला लगावला.
"बारामतीची जागा अपक्ष १ हजार टक्के जिंकली असती"; विजय शिवतारेंचं विधान
"उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडीने भाजपा बहुमत मुक्त केलं आहे. आपण सगळे शिवसैनिक म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना जागलो. पुढच्या चार महिन्यात महाराष्ट्रात सत्तांतर होईल, याची सूत्र उद्धव साहेबांकडेच जाईल, असंही संजय राऊत म्हणाले.
पदवीधरमध्ये दुरंगी तर मुंबई शिक्षक मतदारसंघात तिरंगी सामना
विधान परिषदेच्या कोकण पदवीधर आणि मुंबई पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडी व महायुतीत तिढा सुटला असून या जागांवर आता दाेघांत थेट सामना होणार आहे. मात्र, मुंबई शिक्षक मतदारसंघातील अजित पवार गटाच्या शिवाजी नलावडे यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. तर कोकण पदवीधर संघात महायुतीचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत रंगणार आहे. येथून शेवटच्या क्षणी शिवसेना उद्धवसेनेचे किशोर जैन आणि शरद पवार गटाचे अमित सरैया तर शिंदेसेनेचे संजय मोरे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
तिकडे मुंबई शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे प्रकाश सोनवणे यांनीदेखील उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच भाजपाचे बंडखोर अनिल बोरनारे यांनी अर्ज मागे घेतल्याने येथे उद्धवसेनेचे ज. मो अभ्यंकर आणि भाजपाचे शिवनाथ दराडे आणि अजित पवार गटाच्या शिवाजी नलावडे यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहे.