Join us

निपुण भारत: विद्यार्थ्यांच्या प्रगतीची होणार डिजिटल नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 10:28 AM

राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीची आता डिजिटल नोंद होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : देशातील बालकांच्या वाचन आणि लेखन कौशल्याचा विकास होण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘निपुण भारत’ हे अभियान राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी राज्य शासनाकडून नवा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीची आता डिजिटल नोंद होणार आहे. यासाठी पुण्यात लवकरच शिक्षण समृद्धी केंद्रही स्थापन करण्यात येणार आहे.

राज्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये सुमारे ६५ हजार विद्यार्थी आहेत. या डिजिटल नोंदीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येईल.  या पद्धतीमधून विद्यार्थ्यांचे विषयानुसार मूल्यांकन केले जाणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

शिक्षण विभागाने एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरद्वारे आता राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीचा आढावा घेता येणे शक्य होणार आहे.

पुण्यात सुरू करण्यात येणाऱ्या शिक्षण समृद्धी केंद्रांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  शिक्षण समृद्धी केंद्राद्वारे सर्व शाळांना डिजिटल स्वरूपात जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. या शाळा जोडल्या गेल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती सातत्याने अद्ययावत केली जाणार आहे.

विषयानुरूप गुणवत्ता तपासणी

विद्यार्थी विकासातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. विद्यार्थी विकास आणि त्यांच्या गुणवत्ता वाढीत अडसर ठरणाऱ्या त्रुटी यामुळे दूर होतील. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जिल्हा, तालुका, गावपातळीवरील शाळांत विद्यार्थ्याची विषयानुसार गुणवत्ता तपासली जाणार आहे.

टॅग्स :शाळाविद्यार्थी