Raj Thackeray Aurangabad Sabha: ‘सभा होणारच! राज्यात सत्ता यांची आणि घाबरतात आम्हाला’, मनसेचा आक्रमक पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 09:21 AM2022-04-27T09:21:34+5:302022-04-27T09:27:32+5:30
Raj Thackeray Aurangabad Sabha: मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये नियोजित असलेल्या सभेवरून राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण पुढे करत पोलिसांनी अद्याप या सभेला परवानगी दिलेली नाही. मात्र मनसे औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा घेण्यावर ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत.
मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये नियोजित असलेल्या सभेवरून राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण पुढे करत पोलिसांनी अद्याप या सभेला परवानगी दिलेली नाही. मात्र मनसे औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा घेण्यावर ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यादरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा एक व्हिडीओ ट्विट करत राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेला डिवचले आहे.
संदीप देशपांडे यांनी आज सकाळी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेबाबत मनसेने भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा एक व्हिडीओ ट्विट करत मनसेची औरंगाबादला सभा होणारच असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच राज्यात सत्ता यांची आणि घाबरतात आम्हाला, असा टोला महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेला लगावला आहे. मनसेने सभेबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आता या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्यास आणि मनसे सभा घेण्यावर ठाम राहिल्यास नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, मनसेच्या होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू झाल्याचे वृत्त आले होते. मात्र औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आल्याचं वृत्त चुकीचं असल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी काल दिली होती. औरंगाबादेत आजपासून ९ मेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांवर दाखवण्यात आलं होतं. हे वृत्त चुकीचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
तसेच त्यांनी राज ठाकरे यांच्या सभेविषयीदेखील भाष्य केलं. “राज ठाकरे यांच्या मराठा सांस्कृतिक मंडळात होणाऱ्या सभेला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्याबाबत निर्णय झाल्यानंतर पोलिसांकडून अधिकृतरित्या याबाबत माहिती देण्यात येईल,” असंही गुप्ता यांनी स्पष्ट केलं होतं.