लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अनावश्यक विजेचा वापर टाळण्यासाठी मंत्रालयातील वीज वापराचे ऑडिट करण्यात येत आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास यंत्रणा (मेडा) यांच्याकडून हे काम करण्यात येणार असून, वीज बचत करण्यासाठी सोलार पॅनल बसविण्याची शिफारस करण्यात येणार आहे.
मंत्रालयात असलेली सर्व विभागांची कार्यालये, एस्केलेटर्स, दिवे, पंखे, एसी यामुळे मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होताे. विजेचे बिलही काही कोटींमध्ये येते. ऑडिटमध्ये या सर्वांच्या खर्चाचा आढावा घेतला जात आहे. रोज विजेचा किती वापर झाला, हे बेस्टच्या वीज मीटरच्या नोंदी घेऊन तपासले जात आहे. विजेच्या या सातही मीटरला पाॅवर क्वालिटी ॲनालायझर दिवसभर लावण्यात येत आहे.
सेन्सर असलेले दिवे लावण्याची शिफारस कार्यालयातील विजेच्या दिव्यांना सेन्सर लावण्याची आणि अपारंपरिक ऊर्जेसाठी मंत्रालयाच्या गच्चीवर सोलर पॅनल लावण्याची शिफारस करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. हल्ली केंद्रीय कार्यालयात व खासगी इमारतींमध्ये दिव्यांना सेन्सर लावण्यात आले आहे. यामुळे व्यक्ती जागेवर असेल तरच त्या टेबलावरील दिवा पेटता राहतो. तेथून उठल्यावर तो बंद होतो. तसेच कार्यालय वा व्हरांड्यात हालचाल झाल्यावर दिवे प्रखर होतात. कोणाचा वावर नसल्यास सेन्सरमुळे दिव्यांचा किमान वापर होतो.