Join us

"राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा?"; उद्धव ठाकरेंचा भाजपाला खोचक टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 7:13 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते शुक्रवारी मुंबईतील अटल सेतू या देशातील सर्वात लांब सागरी मार्गाचं उद्घाटन झालं

मुंबई - अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर सोहळ्याचा २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. त्यासाठी, जय्यत तयारी सुरू असून देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील रथी-महारथींना या सोहळ्याचं खास निमंत्रण दिलं जात आहे. दुसरीकडे या सोहळ्याच्या आयोजनावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने शाब्दीक खडाजंगी पाहायला मिळत आहे. आधीच निमंत्रण देण्यावरुन वाद निर्माण झाला असताना आता शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदींना खोचक टोला लगावला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते शुक्रवारी मुंबईतील अटल सेतू या देशातील सर्वात लांब सागरी मार्गाचं उद्घाटन झालं. त्यानंतर, हा प्रकल्प आमच्यामुळेच मार्गी लागला अशी श्रेयवादाची लढाई उद्धव ठाकरे गट आणि भाजपात सुरू झाली आहे. ठाकरे गटाकडून सोशल मीडियात एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले, असा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर भाजपाकडूनही देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत या प्रकल्पाला गती मिळाली असं सांगण्यात येत आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी नाव न घेता पंतप्रधान मोदींना टोला लगावला. तसेच, अटल सेतूच्या उद्घाटन कार्यक्रमात अटलजींचा फोटो कुठेही दिसला नाही, असेही ते म्हणाले. 

अटल सेतूचं उद्घाटन केलं, पण तिथं अटलजींचा फोटो कुठं होता?. त्यामुळे, मला आता थोडी चिंता आहे की, राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा?, असा सवाल शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. सांगता येत नाही, कोणाचीही मूर्ती लावू शकतील. कारण, काल अटले सेतूचं उद्घाटन केलं. नाव अटल सेतू, पण अटलजींचा फोटो कुठेही दिसला नाही. म्हणून, राम मंदिराचं निर्माण करताना एवढी कृपा करा की, त्या मंदिरात स्वत:ची नव्हे तर प्रभू रामचंद्रांची मूर्ती लावा, असा टोला उद्धव ठाकरेंनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.  

मोदींना टोमणा, एकनाथ शिदेंवर निशाणा

उल्हानगरमधील शिवसेना मध्यवर्ती मराठा सेक्शन शाखेसमोर झालेल्या सभेत हजारो नागरिकांनी एकच गर्दी केली होती. कल्याण लोकसभेत निष्ठवंतांला उमेदवारी देऊन गद्दारी घराणेशाहीला गाडून टाकणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले. रामजन्मभूमीला शिवनेरीची माती नेऊन दर्शन घेतल्यानंतर एका वर्षातच न्यायालयाने रामजन्मभूमीबाबत निकाल दिला. तर नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणार असल्याचे मी जाहीर करताच पंतप्रधान मोदी यांनी मंदिराला भेट देऊन साफसफाई केली. आज जाहीर करतो की रामजन्मभूमी कार्यक्रमपूर्वी शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमी शिवनेरीचे दर्शन घेऊन येतो. पंतप्रधान मोदींना याची माहिती मिळाल्यावर ते शिवनेरीला जातात का, हे बघावे लागेल, असा टोमणाही ठाकरेंनी लगावला. तर गद्दार भाजपचे धुणीभांडी घासण्यात स्वतःला धन्यता मानत असल्याचा आरोपही केला.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाराम मंदिरनरेंद्र मोदीदेवेंद्र फडणवीस