Join us

मुंबई महापालिका रुग्णालयांतील औषध खरेदीची चौकशी होणार; राज्य सरकारची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 7:23 AM

मुंबई महापालिका रुग्णसेवेची श्वेतपत्रिकाच एकदा काढावी लागेल, असे सांगत आरोग्य सेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचे आश्वासनही मंत्री सामंत यांनी दिले. 

मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गेल्या काळात औषध खरेदीवर किती खर्च झाला, त्यातून  आरोग्याच्या कोणत्या सुविधा प्राप्त झाल्या, याची चौकशी करून  चौकशीतील निष्कर्षांच्या आधारे राज्य सरकार  कारवाई करेल, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. मुंबई महापालिका रुग्णसेवेची श्वेतपत्रिकाच एकदा काढावी लागेल, असे सांगत आरोग्य सेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचे आश्वासनही मंत्री सामंत यांनी दिले. 

काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनी मुंबईतील सरकारी व पालिका रुग्णालयांतील ढिसाळ कारभारावर  अर्धा तास चर्चेदरम्यान प्रकाश टाकला. मुंबईत सरकारी, खासगी, तसेच धर्मादाय आदी १,३०० रुग्णालये आहेत. जे.जे., कामा, सेंट जॉर्ज आदी रुग्णालयात औषधे नसून तेथे डॉक्टरांचीही कमतरता आहे. यासंदर्भात मंत्र्यांनी पालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी यांना बोलावून त्यांची तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी पटेल यांनी केली. तर मुंबई महापालिकेने सुमारे ४ हजार कोटी रुपये वर्षाला म्हणजे पाच वर्षांत २० हजार कोटी रुपये आरोग्य यंत्रणेवर खर्च केले. यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला जातो. पालिका रुग्णालयात गेलेल्या रुग्णांना बाहेर औषधे आणण्यासाठी पाठविण्यात येते. एक्स-रे, सोनोग्राफीसाठी बाहेर पाठवले जाते. त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आ. आशिष शेलार यांनी केली. 

श्वेतपत्रिका काढणार केईएम हे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सेव्हन स्टार रुग्णालय असून, या रुग्णालयावर मुंबईकरांबरोबरच ग्रामीण भागातील लोकांचा मोठा विश्वास आहे. तो विश्वास कायम राहावा, याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे. पण, रुग्णालयांमध्ये गेल्यावर रुग्णांना बाहेरून औषधे आणायला सांगितले जाते. जनतेच्या पैशांवरच ही रुग्णालये चालतात. त्यामुळे तिथे रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळालीच पाहिजे. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत श्वेतपत्रिका काढणार, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.

 

टॅग्स :उदय सामंतमुंबई महानगरपालिकाहॉस्पिटल