नवी दिल्ली - साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आपल्या दिलदार स्वभावामुळे सर्वपरिचीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेल्यापासून काँग्रेस आघाडीच्या नेत्यांसोबतच त्यांचा वावर कमी झालाय. पण, मित्र बनून ते अनेकांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध जपतात. यापूर्वीही सातारा लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना पराभूत करण्यास कारणीभूत ठरल्यानंतरही राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची गाळभेट घेऊन जाहीरपणे आपली मैत्री उदयनराजेंनी दाखवून दिली होती. आता, राजधानी दिल्लीतही काँग्रेस आघाडीच्या नेत्यांसोबतच त्यांच्या भेटीगाठी घडत आहेत.
सध्या संसदेचं अधिवेशन सुरु असल्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच खासदार राजधानी दिल्लीत आहेत. त्यातच, राज्यातील काँग्रेसमध्ये झालेल्या राजकीय बदलामुळे काही प्रमुख काँग्रेस नेतेही दिल्लीतच आहेत. नुकतेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद मिळालेले नाना पटोले हेही दिल्लीतच होते. काही दिवसांपूर्वीच नाना पटोले (Nana Patole) यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानंतर नाना पटोले हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी त्यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी गेले होते. याचवेळी खासदार उदयनराजे भोसले यांची गाडी तेथून जात होती. तेव्हा नाना पटोले यांना उदयनराजेंनी पाहिले होते. त्यानंतर, गाडी थांबवून उदयनराजेंनी नाना पटोलेंची भेट घेतली. तसेच, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल नानांचे अभिनंदनही करण्यात आले.
महाराष्ट्रातील या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये हातमिळवणी केली. त्यानंतर, उदयनराजेंनी नाना पटोलेंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्यानं. छोटेखानी गप्पा-टप्पाही झाल्या. त्यानंतर, दोन्ही नेते आपल्या आपल्या मार्गाने मार्गस्थ झाले. आता, या भेटीचे छायाचित्र समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांनी अद्याप या भेटीचा जाहीरपणे उल्लेख केलेला नाही.
उदयनराजे आणि श्रीनिवास पाटील भेट
खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचीही भेट घेतली होती. या भेटीत सातारा जिल्ह्याचे प्रश्न मार्ग लावण्यासाठी सामूहिकरित्या संसदेत मांडण्याबाबत चर्चा झाल्याचं उदयनराजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं होतं.