मुंबई : गोरेगाव (पूर्व) मध्ये मुलुंड जोड मार्गावर स्थित शहीद विजय साळसकर उद्यान हे गोरेगाव परिसरातील आबाल वृद्धांसाठी विरंगुळ्याचे महत्त्वाचे ठिकाण ठरते आहे. कोविड - १९ संसर्ग प्रतिबंधक निर्बंधांमध्ये शिथिलता देवून उद्याने आणि मैदाने सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत.
तेव्हापासून या उद्यानात देखील नागरिकांना विरंगुळा मिळू लागला आहे. उद्यानाची शोभा वाढविण्यासाठी व लहान मुलांच्या मनोरंजनाकरिता उद्यानात हत्ती, जिराफ, सिंह, वाघ, गेंडा, यासारख्या विविध प्राण्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आलेल्या आहेत.
सुमारे ६ हजार चौरस मीटर क्षेत्रफळापेक्षा अधिक विस्तीर्ण जागेवर साकारण्यात आलेले शहीद विजय साळसकर उद्यान हे गोरेगाव परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. उद्यान हे विविध प्राणी व पक्षी यांच्या संकल्पनेवर आधारित असून रंगबेरंगी फुलझाडे व हिरवळीने नटलेले आहे.
विविध प्रकारच्या पुष्प वनस्पती याठिकाणी नागरिकांना सुखद अनुभव देत असतात. विस्तीर्ण परिसर आणि निरनिराळ्या सुविधा असल्याने या उद्यानास दररोज किमान २ हजारावर लहान मुले, नागरिक, जेष्ठ नागरिक भेट देत असतात. या उद्यानात विविध मनोरंजनपर सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. सोबत, येथील घसरगुंडी, झोपाळा, टिटर टॉटर, मंकी बार अश्या प्रकाराची विविध खेळणी देखील लहान मुलांसाठी नेहमी आकर्षण ठरत असतात.
आरोग्यदृष्ट्या चालण्याचा/ धावण्याचा व्यायाम करणाऱ्या नागरिकांसाठी सुसज्ज असा जॉगिंग ट्रॅक या उद्यानात आहे. तसेच विविध प्रकारची व्यायामाची साहित्य उपलब्ध आहेत. जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आहे. तसेच निवांत बसून एकमेकांशी संवाद साधता यावा, गप्पा मारता याव्यात म्हणून उद्यानात ठिकठिकाणी गजेबो बसविण्यात आले आहेत. उद्यानात पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणारी पाणपोई आहे. तसेच प्रसाधनगृह सुविधा ही आहे.
कोविड - १९ संसर्ग कालावधीमध्ये नागरिकांना प्रतिबंध असले तरी या उद्यानाचे परिरक्षण योग्यरीत्या करण्यात आले आहे. निर्बंधांमध्ये शिथिलता दिल्यानंतर पुनश्च एकदा या उद्यानात नागरिकांची आणि लहान मुलांची गजबज वाढली आहे. कोविड - १९ प्रतिबंधक निर्देशांचे संपूर्ण पालन करून नागरिकांना येथे विरंगुळा अनुभवता येईल आणि त्यांचे मनोरंजन होईल याची संपूर्ण काळजी उद्यान विभागामार्फत घेण्यात येत आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.