हवामान खात्याचा इशारा; मुंबईतील कमाल तापमान ३८ अंशांवर
उष्णतेच्या लाटेचा तडाखा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मार्च महिना संपत आहे तसा कमाल तापमानाचा पारा चढत आहे. बुधवारी कमाल तापमानाने कहर केला असून, मुंबईचे कमाल तापमान थेट ३८.१ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. यंदाच्या मोसमातला आतापर्यंतचा हा उच्चांक असून, वाढत्या उन्हाने मुंबईकर घामाघूम हाेत आहेत. कमाल तापमानाचा तडाखा कायम राहणार असून, २५ मार्च रोजी कोकणात काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भ आणि लगतच्या भागावर असलेला चक्रवात आता मध्य प्रदेश आणि लगतच्या भागावर आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची नोंद झाली आहे. कोकण आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. कोकणातील तुरळक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली असून, तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासूनच मुंबईकरांना उन्हाचे चटके जाणवू लागले. उष्ण वारे वाहत हाेते. दुपारी ४ नंतरही उन्हाचा तडाखा कायम असल्याचे चित्र होते.