वेसावे खाडीचा गाळ उपसण्यासाठी त्वरित १५ कोटी निधी होणार उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 09:08 PM2018-01-04T21:08:27+5:302018-01-04T21:09:10+5:30
वेसावकरांची कामधेनू असलेेल्या वेेसावेे खाडीतील गाळ गेेली अनेक वर्षे काढला नसल्यामुुळे येथील 500 मच्छिमार बांधवांच्या उपजीविकेच्या साधनावर निधीच्या कमतरतेमुळे मोठी गदा येत होती.
मनोहर कुंभेजकर
मुंबई: वेसावकरांची कामधेनू असलेेल्या वेेसावेे खाडीतील गाळ गेेली अनेक वर्षे काढला नसल्यामुुळे येथील 500 मच्छिमार बांधवांच्या उपजीविकेच्या साधनावर निधीच्या कमतरतेमुळे मोठी गदा येत होती.सदर गाळ काढण्यासाठी निधी देण्यात यावा म्हणून संसदेत शिवसेना नेते व उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी आवाज उठवला होता.खासदार कीर्तिकर यांनी संसदेत विविध योजनांच्या माध्यमातून वेसावे खाडीतील गाळ काढण्याचा समस्येसाठी निधी उपलब्ध करून दिला जावा अशी सातत्याने आग्रही मागणी केली होती."लोकमत"ने हा विषय सातत्याने मांडला होता.
याप्रकरणी त्यांनी केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांची त्यांनी नुकतीच प्रत्यक्ष भेट घेऊन सदर निधीची मागणी करणारे निवेदन सादर केले. यावेळी येथील गाळ काढण्यासाठी १५ कोटी निधी त्वरित वितरित करण्याचे आदेश गडकरी यांनी दिल्याची माहिती खासदार कीर्तिकर यांनी दिली.
महाराष्ट्रातील 720 किमी सागरी किनारपट्टी भागातील पारंपारिक व्यवसाय म्हणून मासेमारी व्यवसाय सर्वत्र परिचित आहे.परंतू केरळ नंतर देशात मासेमारीत वेसावे कोळीवाड्याचा दुसरा क्रमांक लागतो.वेसावे खाडी परिसरामध्ये गेली अनेक वर्षे साठत चाललेल्या गाळामुळे येथील मच्छिमार बांधवाना आता अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून त्याचा परिणाम त्यांच्या मासेमारी व्यवसायावर होत आहे.
वेसावे खाडीतील गाळ काढण्यासाठी 4.1 कोटी सदर निधी मिळाल्यामुळे गेल्या 16 डिसेंबर रोजी येथील गाळ काढण्याचा शुभारंभ खासदार कीर्तिकर यांच्या हस्ते सकाळी वेसावे समुद्रकिनारी पार पडला होता.तर सायंकाळी वर्सोवा विधानसभेच्या भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी खाडीत असलेल्या बार्जवर जाऊन याकामाचे उदघाटन केले होते.येथील गाळ काढण्यावरून सेना आणि भाजपात जोरदार श्रेयाची लढाई जुंपली होती.तर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी खासदार कीर्तिकर यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या गाळ काढण्याच्या
कामाची पाहणी केली. वेसावकरांच्या आग्रहास्तव माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर(शैलेश)फणसे यांच्या उपस्थितीत येथील समुद्रकिनारी गेल्या 23 डिसेंबर रोजी शौचालयाच्या उदघाटनप्रसंगी ते आले असता त्यांनी कार्यक्रमानंतर बार्जवर जाऊन गाळ काढण्याच्या त्यांनी या कामाची पाहणी केली.
यासंदर्भात खासदार कीर्तिकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि, वर्सोवा खाडीतील साचलेल्या गाळामुळे या भागातील 350 मोठ्या आणि 150 छोट्या मच्छिमार बोट मालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.दिवसेंदिवस या भागातील मच्छिमार बांधवांच्या नौकांची संख्या खालावत चालली आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून गाळ उपसण्याचे काम युद्ध पातळीवर होणे आवश्यक आहे. मंडळामार्फत संबंधित मंत्रालयाकडे सागरमाला योजने अंतर्गत, रूपये ३८.६२ कोटींची मागणी करण्यात आली आहे. निधी तत्काळ उपलब्ध झाल्यास ८८०००० घन.मी. गाळ उपसला जाऊ शकतो. त्यासाठी ३१ जुलै व १६ ऑगस्ट २०१७ रोजी देखील मंडळाने पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे अशी माहिती त्यांनी दिली.