- योगेश जंगम मुंबई : मुंबई व उपनगरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) अनेक पायाभूत सुविधा राबवण्यात येत आहेत; परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे गेल्या महिन्यात देशभरामध्ये लॉकडाउन करण्यात आल्याने या सर्व प्रकल्पांना अंशत: स्थगिती मिळाली होती. आता शासनाचे नियम पाळत हळूहळू प्रकल्पांच्या कामांना सुरूवात करण्यात येत आहे. यामुळे या सर्व प्रकल्पांच्या कालावधीत आणि खर्चात वाढ होणार आहे. यामध्ये किती वाढ होईल हे आता सांगता येणार नाही, मात्र सर्व प्रकल्पांचे काम पूर्ण होईल असे आम्ही निश्चित सांगतो, असे सांगत येणाऱ्या आव्हानासाठी आम्ही सज्ज आहोत असा विश्वासही एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए.राजीव यांनी व्यक्त केला.प्रश्न : लॉकडाउनमुळे प्रकल्पांवर नेमका काय परिणाम होईल ?उत्तर : लॉकडाउनमुळे एमएमआरडीएच्या सुरू असलेल्या प्रकल्पांचा कालावधी वाढेल, यासह प्रकल्पांच्या खर्चाच्या किमतीतही वाढ होईल. सध्याच्या घडीला किती कालावधी वाढेल अथवा किती खर्चात वाढ होईल हे निश्चित सांगता येणार नाही. प्रकल्पांना अंशत: बंदी होती़ आता सर्व नियम पाळून हळूहळू टप्प्याटप्प्याने काही प्रकल्पांचे काम सुरू करण्यात आले आहे. काही दिवसांत उर्वरित प्रकल्पांचीही कामे सुरू करण्यात येतील. पुढे आणखी जोरात प्रकल्पांची कामे सुरू होतील. याला थोडा वेळ लागेल. अद्याप अनिश्चितता असल्याने काहीच सांगता येणार नाही. सर्व प्रकल्पांचे काम पूर्ण होईल.प्रश्न : बंद असलेले सर्व प्रकल्प कधीपर्यंत सुरू होतील आणि नवीन धोरण काय असेल ?उत्तर : शासनाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार आम्ही आमच्या काही प्रकल्पांची कामे सुरू केली आहेत. सोशल डिस्टन्सिंग ठेवत वेळोवेळी कामगारांची आरोग्य तपासणी करत काही प्रकल्पांच्या कामांना सुरुवात केली आहे. शासनाच्या नियमांप्रमाणे कामगार बाहेरून न आणता विभागातील कामगारांद्वारे काम करण्यात येत आहे. प्रादुर्भाव झालेल्या विभागांमध्ये काम करता येणार नाही असा नियम आहे. आमच्या बहुतांश प्रकल्पांचे काम हे हायवे आणि मुख्य रस्त्यांवर असल्याने तेथील कामांना हळूहळू सुरूवात करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस आणि स्थानिक आॅथोरिटीला पत्र देऊन कळवणे, कामगारांचे कार्ड बनवणे, कामगारांची यादी देणे अशा विविध प्रक्रिया सध्या सुरू असून ही प्रक्रिया पार पडल्यावर प्रकल्पांची कामे सुरू करण्यात येतील. मुंबईच्या बाहेरील प्रकल्पांची कामे सुरू झाली आहेत. मुंबईतील काही कामे सुरू करण्यात आली असून लवकरच सर्व कामांना सुरूवात करण्यात येईल.प्रश्न: पावसाळापूर्व कामे अल्पावधीत कशी करण्यात येतील ?उत्तर : पावसाळापूर्व कामे ही वेळेत पूर्ण होणे खूप महत्त्वाचे आहे. त्यादिशेने आम्ही वेगाने कामाला लागलो आहोत. पूर्व आणि पश्चिम दु्रतगती महामार्गांची जबाबदारी आमची असल्याने या महामार्गांची दुरूस्ती सुरू केली आहे. या मार्गांवरील खड्डे भरणे, रस्त्याच्याकडील नाले दुरुस्ती करणे अशा कामांना आम्ही सुरुवात केली आहे. लवकरच ही कामे पूर्ण करण्यात येतील.प्रश्न : प्रकल्पांची कामे करणाºया कामगारांची कशी काळजी घेतली जात आहे ?उत्तर : कामगारांची आम्ही विशेष काळजी घेत आहोत. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आवश्यक सर्व गोष्टींचा पुरवठा केला जात आहे. त्यांची राहण्याचीही सोय करण्यात आली असून त्यांना स्वच्छतेचे धडेही दिले जात आहेत.
एमएमआरडीए प्रकल्पांच्या खर्चात होणार वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 1:55 AM