मुंबई : नुकतेच राज्य सरकारने महिलांच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात १ टक्क्याने सवलत देण्याची घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे येत्या काळात राज्यात महिला घरखरेदीदारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
आर्थिकदृष्ट्या सक्षम स्त्रिया या सवलतीचा फायदा घेत घर खरेदी करणार आहेत. तर या १ टक्के मुद्रांक शुल्क सवलतीचा फायदा घेण्यासाठी अनेक कुटुंबातील पुरुष घर खरेदी आपली आई, मुलगी, बहीण किंवा बायकोच्या नावे करण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काळात राज्यात जास्तीतजास्त घरांची मालकी स्त्रियांकडे जाणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
१ एप्रिलपासून ही योजना सुरू होत असल्याने जास्तीतजास्त महिलांना याचा लाभ घेता येणार आहे. याआधी राज्य सरकारने २०२०च्या सप्टेंबर आणि डिसेंबर तर २०२१च्या जानेवारी आणि मार्चमध्ये मुद्रांक शुल्कात अनुक्रमे ३ आणि २ टक्के सवलत जाहीर केली होती. या सवलतीमुळे राज्याच्या वार्षिक उत्पन्नात घट होणार असली तरीदेखील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
मागच्या काही वर्षांमध्ये महिलांचे घर खरेदीचे प्रमाण वाढले आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक अधिक योग्य मानत असल्याचे सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे.
६२ टक्के स्त्रिया या बँक, शेअर बाजार व सोने यातील गुंतवणुकीपेक्षा घर खरेदी करण्याला अधिक पसंती दर्शवत आहेत. याउलट ५४ टक्के पुरुष आपली गुंतवणूक बांधकाम क्षेत्रात करतात. यामुळे येत्या काळात हा ट्रेंड असाच सुरू राहून महिला घरखरेदीदारांमध्ये आणखी वाढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
डॉ. निरंजन हिरानंदानी (व्यवस्थापकीय संचालक, हिरानंदानी ग्रुप) - कोरोना काळात बांधकाम क्षेत्रापुढे अनेक आव्हाने उभी राहिली. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्र आता पुन्हा एकदा नव्याने उभारी घेऊ शकणार आहे. सरकारने मुद्रांक शुल्कात १ टक्क्याने सवलत देऊन महिलांना घर खरेदी करण्यास प्रोत्साहित केले आहे. त्यामुळे येत्या काळात घरमालक स्त्रिया असणार आहेत.