फटाफट कर्ज मिळेल, झटपट बदनामी होईल; ‘फास्ट कॉईन’ॲपकडून फोटोंचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 07:17 AM2022-06-03T07:17:41+5:302022-06-03T07:17:48+5:30
अनेकांचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल केले जात असून कर्ज फेडले नाही तर आणखी बदनामी करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
मुंबई: कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकजण कर्जबाजारी झाले. आता निर्बंध हटवल्यानंतरही हळूहळू आर्थिक घडी बसत असताना अनेकजण छोट्या मोठ्या गरजा भागवण्यासाठी दोन ते पाच हजार रुपयांचे कर्ज इन्स्टंट लोन ॲपच्या माध्यमातून उचलत आहेत. परंतु, याची कर्ज घेणाऱ्यांना फार मोठी किंमत चुकवावी लागत आहे.
अनेकांचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल केले जात असून कर्ज फेडले नाही तर आणखी बदनामी करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हे सत्र थांबण्याचे नाव घेईना. आता ‘फास्ट कॉईन’ ॲपकडून तीन हजार रुपयांचे कर्ज परत न केल्याने एका ३६ वर्षीय तरुणाचे फोटो व्हायरल करण्यात आले आहेत. याप्रकरणी बुधवारी संध्याकाळी कुरार पोलिसात अनोळखी मोबाईलधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
कुरारच्या एसआरए इमारतीमध्ये संबंधित पीडित तरुण राहतो. तो खासगी कंपनीत नोकरी करत असून त्याने २४ मे, २०२२ रोजी ‘फास्ट कॉईन’ हे ॲप डाउनलोड करुन त्यातून ३ हजार रुपयांचे लोन घेण्याकरिता त्यात त्यांची वैयक्तिक माहिती दिली. ते कर्ज फेडण्यासाठी त्यांना ३१ मे २०२२ रोजी ७४७८११०२५९ या क्रमांकावरून लोनचे पैसे भरण्यासाठी शिवीगाळ तसेच धमकीचे मेसेजस येत होते. त्यानंतर सदर मोबाईलसह ९१०२५०९५४९ व ८६०८९५२९७ या अन्य दोन क्रमांकावरुन व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून “अगर आप लोन का पेमेंट नही करोगे तो हम आपकी इमेज खराब कर देंगे, आपके फोटो एडिट करके हम सबको भेज देंगे” अशी धमकी दिली गेली. तसेच त्यांचे एडिट केलेले अश्लील फोटोदेखील त्यांना पाठविण्यात आले.
नववा गुन्हा दाखल
पीडिताने पैसे न दिल्याने त्यांच्या संपर्कात असलेले त्यांचे नातलग, मित्र-परिवार, ऑफिस स्टाफ यांना मॉर्फ फोटो पाठविण्यात आले. तसाच फोटो त्यांच्या जवळच्या एका मित्राला ७४७८११०२५९५ या क्रमांकावरुन तसाच फोटो मिळाला. तेव्हा त्याने याची माहिती पीडिताला दिली आणि अखेर याप्रकरणी कुरार पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. तेव्हा त्यांचा जबाब नोंदवून घेत याप्रकरणी चार अनोळखी मोबाईलधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, कुरार पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा नववा गुन्हा असून संदीप कोरेगावकर आत्महत्येसह चार प्रकरणे उत्तर मुंबईतील समतानगर सायबर पोलीस ठाण्यात वर्ग केली जाणार आहेत.