लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असली तरी मुंबईतील रुग्णालयांमध्ये ८३ टक्के खाटा रिक्त आहेत. तर दोन हजार रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. प्रभावी लसीकरणामुळेच ओमायक्रॉनच्या संसर्गाचा सामना करणे शक्य झाले आहे. त्यामुळे लसीकरण पूर्ण झाले असल्यास लोकलमधून प्रवास करण्यासही धोका नाही. वाढत्या आकड्यांवर नव्हे तर रुग्णालयातील खाटा आणि ऑक्सिजनची मागणी यावर लॉकडाऊन अवलंबून असल्याचे स्पष्ट करत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबईत लॉकडाऊनची शक्यता फेटाळली आहे.
मुंबईत दररोज कोविड रुग्णसंख्येत २० टक्क्यांनी वाढ होत असल्याने सामान्य जनतेमध्ये लॉकडाऊनची भीती पसरली आहे. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर पाहून लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात आला होता. आता या मापदंडामध्ये बदल करत रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटा आणि ऑक्सिजनची दररोजची गरज हे निकष महत्त्वाचे असल्याचे आयुक्तांनी ‘लोकमत’ला सांगितले. मुंबईत १८६ पालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये एकूण ३५ हजार खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव आहेत. सक्रिय रुग्णांचा आकडा एक लाखांवर पोहोचला तरी प्रत्यक्ष १७ टक्केच रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तरीही परिस्थितीवर राज्य सरकार आणि पालिकेचे बारीक लक्ष आहे, असे त्यांनी सांगितले.
लसवंताला लोकल प्रवासाचा धोका नाही...
सेव्हन हिल्स रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या कोविड रुग्णांनी एकही डोस न घेतल्याचे आढळून आले आहे. दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीला कोरोना झाल्यास तो सौम्य प्रकारचा असून, पाचव्या दिवशी रुग्ण बरा झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईत १०८ टक्के पहिला डोस तर दुसरा डोस ९० टक्के पूर्ण झाला असल्याने लोकल प्रवासात धोका नाही. मात्र, शक्यतो गर्दीत जाणे टाळा, योग्यरित्या मास्क लावा आणि कोविड प्रतिबंधक नियम पाळून स्वतःला, कुटुंबाला व शहराला वाचवा, असे आवाहन आयुक्तांनी मुंबईकरांना केले आहे.
सेल्फ टेस्ट किटचीही होते नोंद...
कोविडची लक्षणे दिसताच मुंबईत अनेकजण सेल्फ टेस्ट किट आणून घरच्या घरी चाचणी करत आहेत. यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, या किटमध्ये कितीजण पॉझिटिव्ह आले, याची माहिती पालिकेला ऑनलाईन उपलब्ध होत असल्याचा दावा आयुक्तांनी केला. गुरुवारी ३,८०० लोकांनी केलेल्या चाचणीत २८८ जण पॉझिटिव्ह आढळल्याचेही त्यांनी सांगितले.
आणखी दहा दिवस महत्त्वाचे....
दक्षिण आफ्रिकेत पाचव्या आठवड्यात लाट ओसरल्याचे दिसून आले होते. मुंबईत घातक डेल्टा व्हेरिएंट १५ टक्के तर ओमायक्रॉन ८० ते ८५ टक्के पसरला आहे. एका आठवड्यात ओमायक्रॉन शंभर टक्के होईल, असा अंदाज आहे. आता मुंबईचा तिसरा आठवडा पूर्ण होत आहे, त्यामुळे आणखी दहा दिवस काढले तर लाट ओसरेल, असे अभ्यासावरुन दिसून येते, असा अंदाज आयुक्तांनी व्यक्त केला आहे. मात्र, ओमायक्रॉन हा फ्लू नसून विषाणूच असल्याने कोविड नियम पाळा आणि लसीकरण पूर्ण करुन घ्या, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.