आज अशा बऱ्याच बातम्या मिळतील; अब्दुल सत्तार राजीनाम्यानंतर चंद्रकांतदादांचा चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 11:46 AM2020-01-04T11:46:41+5:302020-01-04T11:49:05+5:30
अब्दुल सत्तार यांची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी पुढाकार घेतला आहे.
मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटकपक्षामधील अनेक नेत्यांची नाराजी समोर आली होती. दरम्यान, मंत्रिमंडळात स्थान मिळूनही केवळ राज्यमंत्रिपद मिळाल्याने शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यामुळे भाजपाला सुखद धक्का बसला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अब्दुल सत्तार यांची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी पुढाकार घेतला आहे. अर्जुन खोतकर यांनी सत्तारांशी चर्चाही केली आहे. अब्दुल सत्तार हे आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून शिवसेनेत आले होते. सध्या, ते शिवसेनेच्या तिकिटावर सिल्लोड मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल अशी सत्तार यांना अपेक्षा होती. त्यानुसार शिवसेनेने सत्तार यांना राज्यमंत्रिपद दिले. तर औरंगाबादमधून पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. मात्र, कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने सत्तार नाराज झाले. अखेर आज त्यांनी खातेवाटप जाहीर होण्यापूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
अब्दुल सत्तार यांनी राजीनामा देताच, भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडीत मोठी फूट पडणार असल्याचे सूतोवाच केलं आहे. भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर, आज दिवसभरा अशा बऱ्याच बातम्या येतील, असे म्हटले आहे. तर, भाजपा नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनीही, महाविकास आघाडीत नाराजी असल्याचं उघड झाल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे, भाजपाकडून महाविकास आघाडीतील नाराज आमदारांशी संपर्क साधण्यात येत असल्याचेही वृत्त समजते. दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया देताना मला याबाबत कल्पना नसल्याचे म्हटले आहे.