यंदा मरेच्या लोकलची वॉटरबस होणार नाही; नाल्यावर लोखंडी कवच, मान्सूनपूर्व तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 08:27 AM2023-05-01T08:27:03+5:302023-05-01T08:28:31+5:30
दीड महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची मान्सून पूर्व तयारी सुरू झाली आहे.
मुंबई - दरवर्षी थोडा पाऊस पडला तरी रेल्वे रुळावर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होते. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून मान्सून तयारीवर जोर देत आहे. यंदाही मध्य रेल्वेने मान्सून पूर्व तयारी सुरू केली आहे. रेल्वे स्थानकांतील नाल्यावर लोखंडी जाळ्या बसविण्यात येत आहे.
दीड महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची मान्सून पूर्व तयारी सुरू झाली आहे. नाले सफाई, पाणी उपसण्यासाठी पंपाची व्यवस्था, रेल्वे रूळ मार्ग सफाई, झाडांच्या फांद्याची छाटणी, अशी कामे रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याशिवाय रेल्वे स्थानकातील नाल्यामधील स्वच्छतेवर रेल्वेकडून उपाययोजना केल्या जात आहे. अनेकदा स्थानकातील नाल्यांमध्ये प्लास्टिक व इतर कचरा अडकल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे स्थानकात पाणी साचून रेल्वे सेवा ठप्प होते. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नाल्यातील कचरा रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असून नाल्यांवर लोखंडी जाळ्या लावण्याच्या कामाला नुकतीच सुरुवात करण्यात आली. मध्य रेल्वेच्या भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली तसेच हार्बर मार्गावरील शिवडी, कुर्ला, चेंबूर, चुनाभट्टी, मानखुर्द स्थानकांतील लोखंडी जाळ्या लावण्याचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे.
प्लास्टीकमुळे तुंबतात नाले
नाल्यांमध्ये प्लास्टीकचा कचरा अडकल्यास पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. दरवर्षी नालेसफाईवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले तरी अनेक ठिकाणी रूळ पाण्याखाली गेल्याचे पावसाळ्यात पाहायला मिळते. त्यामुळे यंदा रेल्वेच्या नाल्यात अडकणारा कचरा रोखण्याच्या दृष्टीने स्थानकातील नाल्यांमध्ये जाळ्या लावण्यास सुरुवात केली आहे.