राज्यांतर्गत रेल्वेसेवा अद्याप सुरू नसणार, प्रवासी नागरिकांना आरक्षण रद्द करावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 10:41 PM2020-05-21T22:41:22+5:302020-05-21T22:41:47+5:30
गुरुवारपासून रेल्वेने सामान्य प्रवाशांसाठीच्या ट्रेनची ऑनलाईन बुकिंग सुरु केली.
मुंबई : रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यातल्या समन्वय गोंधळ सुरु आहे. या गोंधळामुळे राज्यातील नागरिकांना मनस्ताप भोगावा लागत आहे. २०० ट्रेनच्या फेऱ्या १ जूनपासून धावणार आहेत. मात्र, या फेऱ्या पुढील सूचना मिळेपर्यंत राज्यांतर्गत रेल्वे प्रवास करता येणार नाही, असे आदेश रेल्वे प्रशासनाने काढले आहेत. परिणामी, राज्यातील अडकलेल्या नागरिकांनी केलेले तिकिटाचे आरक्षण रद्द करावे लागणार आहे. रेल्वेने चूक लक्षात आल्यानंतर ती सुधारेपर्यंत शेकडो लोकांची तिकीटआरक्षित झाली होती.
गुरुवारपासून रेल्वेने सामान्य प्रवाशांसाठीच्या ट्रेनची ऑनलाईन बुकिंग सुरु केली. १ जूनपासून देशभरात १०० रेल्वे रिटर्न फेऱ्या करणार असून असे २०० प्रवास रोज रेल्वेच्या माध्यमातून मजुरांव्यतिरिक्त सामान्य प्रवाशांसाठी ही सोय असणार आहे. या सर्व ट्रेन नॉन एसी असणार आहेत. याची घोषणा झाल्यानंतर आज सकाळी १० वाजेपासून त्याची रीतसर ऑनलाईन बुकिंग देखील सुरू झाली. मात्र, देशभरात ट्रेन सुरू झाल्या असल्या, तरी प्रत्येक राज्याचे लॉकडाऊनचे नियम मात्र वेगळे आहेत. महाराष्ट्रात आंतरजिल्हा म्हणजेच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी नाही. मात्र, ही बाब रेल्वेला समजल्यावर रेल्वेने नवीन आदेश जारी केले.