मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला विजेचा पुरवठा करणाऱ्या पारेषण वाहिन्यांची क्षमता संपुष्टात आली असतानाच दुसरीकडे वारंवार होत असलेल्या बिघाडाच्या कारणास्तव मुंबईत ‘ब्लॅक आऊट’ होण्याच्या घटना घडल्या होत्या. यावर उपाय म्हणून मुंबईला अतिरिक्त वीजपुरवठा करता यावा म्हणून पारेषण वाहिन्यांचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे मुंबईकरांना आता आणखी हजार मेगावॉट वीज उपलब्ध होणार आहे.
खारघर - विक्रोळी या ४०० केव्ही क्षमतेच्या पारेषण वाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. परिणामी ऐनवेळी बिघाड होऊन मुंबई अंधारात जाण्याची घटना टाळता येणार आहे.
मुंबईच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. नव्या खारघर - विक्रोळी पारेषण
वाहिनीमुळे मुंबईत अतिरिक्त वीज आणणे शक्य होणार आहे. भविष्यातील विजेची मागणीदेखील पूर्ण करता येणार आहे.
- अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड
बुलेट ट्रेन, मेट्रोसाठी महत्त्वाचा प्रकल्प
खारघर-विक्रोळी वीज वाहिनीमुळे भविष्यात मुंबईला अतिरिक्त १ हजार मेगावॅट वीज मिळेल.
बुलेट ट्रेन, मेट्रो रेल्वे आणि रेल्वे तर व्यावसायिक आणि निवासी वीज ग्राहकांसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.
खारघर विक्रोळी पारेषण वाहिनी सुरू. ४०० केव्ही वीज जोडणी अखेर स्थापित
हा प्रकल्प नवी मुंबईच्या खारघर परिसरात सुरू होतो आणि विक्रोळी येथे संपतो.
खाडीत सहा मनोरे
पारेषण वाहिनी टाकताना, कठीण भूप्रदेश पार करताना आव्हानांचा सामना करावा लागला. प्रगत तंत्रज्ञानाने त्यावर मात करण्यात आली. तरंगत्या बार्जेसवर जड रिग वापरून खाडीत सहा मनोरे बांधण्यात आले. तर शहरी भागात विशेष मनोऱ्याचा अवलंब करून काही ठिकाणी उंचीचे निर्बंध दूर केले गेले.
ऐन उन्हाळ्यात विजेची मागणी वाढते. सध्या विजेची मागणी सुमारे ४ हजार मेगावॅटच्या आसपास आहे. ऑक्टोबर हिट आणि उन्हाळ्यामुळे विजेची उपकरणे वेगाने आणि २४ तास सुरू असल्याने विजेची मागणी सर्वाधिक नोंदविली जाते. अशावेळी अतिरिक्त वीज मिळावी म्हणून वीज वाहिन्यांचे काम सुरू आहे.
भविष्यात मागणीनुसार विजेचा पुरवठा करताना अतिरिक्त वीज वाहून आणण्यासाठी २ हजार मेगावॅट क्षमतेच्या पारेषण वाहिन्यांचे जाळे उभे केले जात असून, त्यापैकी एक खारघर-विक्रोळी ही वाहिनी आहे. तर दुसरा प्रकल्प कुडूस-आरे असा १ हजार मेगावॅट क्षमतेचा आहे.
मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या चार ४०० केव्ही वीजवाहिन्या आहेत. या चारही वाहिन्या ४०० केव्ही कळवा उपकेंद्र येथे येतात. तेथून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राला वीज वितरित केली जाते.
खारघर-विक्रोळी प्रकल्प कसा आहे ?
प्रकल्पात अंदाजे ७४ सर्किट किलोमीटर ४०० केव्ही आणि २२० केव्ही पारेषण वाहिनीचा समावेश आहे.
विक्रोळी येथे १,५०० एमव्हीए ४०० केव्ही गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनचा समावेश आहे.
मुंबईतील हे पहिले ४०० केव्ही उपकेंद्र असून, ते अंदाजे ९,५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरले आहे.
खारघर येथे एअर इन्सुलेटेड सिस्टीम स्विचयार्ड आहे.