निकालानंतर तीन दिवसांत सरकार स्थापनेची गरज नसेल

By यदू जोशी | Published: October 16, 2024 09:55 AM2024-10-16T09:55:18+5:302024-10-16T09:57:06+5:30

अधिसूचना काढून विधानसभा होईल स्थापन; पहिल्या अधिवेशनापासून नवीन विधानसभेला मिळेल पाच वर्षांचा कालावधी 

There will be no need to form the government within three days after the result | निकालानंतर तीन दिवसांत सरकार स्थापनेची गरज नसेल

निकालानंतर तीन दिवसांत सरकार स्थापनेची गरज नसेल

यदु जोशी -

मुंबई : १४ व्या विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत असल्याने येत्या २३ नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तीनच दिवसांत सरकार कसे काय स्थापन होईल? अशी शंका उपस्थित केली जात आहे. प्रत्यक्षात केवळ तीन दिवसांत सरकार स्थापन करण्याची गरजच नसेल. सरकार स्थापनेची प्रक्रिया कशी-कशी असेल हे समजून घेतले तर या प्रश्नाचे उत्तर मिळते.

मतदान २० नोव्हेंबरला होणार आहे, निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होतील. २४ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाकडून राज्यपालांकडे निकालाची प्रत सुपूर्द केली जाईल. 

विद्यमान १४ व्या विधानसभेची मुदत ही २६ नोव्हेंबरपर्यंत आहेच. त्यामुळे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी हे लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम ५१ नुसार, राज्य विधानसभा स्थापन झाली असल्याची अधिसूचना २७ नोव्हेंबरला काढतील. त्यानुसार विधानसभा स्थापन झाल्याचे मानले जाईल. त्यासाठी लगेच विधानसभेचे अधिवेशन घेण्याची गरज नसेल.

त्यानंतर नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. मग राज्यपाल विधानसभेचे अधिवेशन बोलावतील. या अधिवेशनात नवीन आमदारांचा शपथविधी होईल. विधानसभेच्या अध्यक्षांची निवड आणि विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांची निवड होईल.
या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून पुढे पाच वर्षे हा १५ व्या विधानसभेचा कार्यकाळ असेल. त्यामुळे निकालानंतर तीनच दिवसांत सरकार स्थापन करण्याचे कोणतेही बंधन कायद्यानुसार नाही. हे लक्षात घेता डिसेंबरमध्येही नवीन सरकार स्थापन होऊ शकते.

राज्यात निकालानंतर राष्ट्रपती राजवट लागू शकेल का?
कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही, किंवा कोणत्याच पक्षाने लगेच सरकार स्थापनेचा दावा केला नाही किंवा असा दावा करूनही संबंधित राजकीय पक्ष राज्याला स्थिर सरकार देऊ शकणार नाही असे राज्यपालांना वाटले तर राज्यात काही दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागू शकेल. अर्थात त्या आधी विधानसभा स्थापन करणे बंधनकारक असेल. या राजवटीच्या काळात पुन्हा जोडतोडीचे राजकारण होऊ शकेल आणि सत्तास्थापनेचा दावा निश्चितपणे केला जाईल, त्यानंतर राज्यपाल संबंधित पक्ष/आघाडीला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करतील, अशीही एक शक्यता आहे. कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले तर काहीच दिवसांत सरकार स्थापन होईल व राष्ट्रपती राजवटीची गरज नसेल.

Web Title: There will be no need to form the government within three days after the result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.