मुंबई- मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही समझौता होणार नसल्याचा स्पष्ट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला आहे. अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद देऊ, असं कधीच कबूल केलं नव्हतं. 1995चा फॉर्म्युला येईल वगैरे असं काहीही होणार नाही, सीएमपदासाठी प्रस्ताव आला होता, पण अशी कुठलीही बातचीत झाली नाही, असं अमित शहांनीही मला सांगितल्याचा खुलासाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर शिवसेना आणि भाजपामधली धूसफूस आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भाजपाच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा शिवसेनेला शब्द दिलेला नव्हता. वाटाघाटीत अडीच वर्षांत मुख्यमंत्रिपदाचा शब्द नव्हता. आम्ही चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, कोणतीही आडमुठी भूमिका नाही. त्यांच्या मागण्या रास्त असल्यास विचार करू. आम्ही कुठलाच पर्याय शोधत नाही आहोत. शिवसेनाही शोधत नाही आहे. निम्मं निम्मं काय ठरलं होतं ते येत्या दोन ते तीन दिवसांत कळेल, असंही सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक शनिवारी मुंबईत झाली होती. अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद आपल्याकडे घ्या आणि सत्तेत ‘फिफ्टी-फिफ्टी’चा वाटाही घ्या, असा आग्रह शिवसेनेच्या आमदारांनी तिथे धरला होता. सत्तास्थापनेबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार आमदारांनी उद्धव यांना दिले होते. शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी बैठकीनंतर सांगितले की, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासह जे जे ठरेल ते भाजपाने लेखी द्यावे. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी असं काहीही होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद देऊ, असं कधीच कबूल केलं नसल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.