जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भांडुप पश्चिमेकडील श्रीराम पाडा परिसरातील सॅडल बोगद्याजवळ १,८०० मी. मी. व्यासाच्या तानसा जलवाहिनीमधे गळती झाल्याने महानगरपालिकेमार्फत तातडीचे दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे.
दुरुस्तीचे काम योग्य प्रकारे व्हावे, यासाठी जलवाहिनी वरील पाण्याचा दाब कमी करणे गरजेचे असून याकरिता भांडुप कॅबिन येथील तानसा पश्चिम जलवाहिनीवरील झडप बंद करणे आवश्यक आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे १२ तासाचा कालावधी लागणार आहे. परिणामी भांडुप पश्चिम परिसरातील काही ठिकाणी आज गुरुवारी पाणीपुरवठा होणार नाही.
दुरुस्ती कामामुळे 'एस' विभागातील भांडुप पश्चिमेकडील डोंगराळ भागात पाणी पुरवठा बाधित होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने श्रीरामपाडा, तुळशेतपाडा, वाघोबावाडी, रामनगर, तानाजीवाडी , रावते कंपाऊंड, त्रिमूर्ती नगर, शिवाजी नगर, नरदास नगर, टेंभीपाडा, साई हिल, साई विहार, सोनापूर येथील काही भाग, खिंडीपाडा, गांव देवी रोड, गाव देवी टेकडी, मरोडा हिल, पाटकर कंपाऊंड, गणेश नगर, सर्वोदय नगर तसेच भांडुप जलाशय येथून होणारा पाणी पुरवठा, रमाबाई नगर पंपिंग, महात्मा फुले नगर पंपिंग सप्लाय व डांबर कंपनी या ठिकाणांचा समावेश आहे. जलवाहिनी दुरूस्तीचे काम पूर्ण होइपर्यंत या परिसरांमधील पाणीपुरवठा बंद राहील.