दगडी चाळीला खिंडार पडणार
By admin | Published: February 7, 2017 04:37 AM2017-02-07T04:37:42+5:302017-02-07T08:11:16+5:30
गुन्हेगारी जगतात एकेकाळी दरारा असलेल्या अरुण गवळी यांनी २० वर्षांपूर्वी अखिल भारतीय सेना या पक्षाची स्थापना केली
मुंबई : गेल्या दशकात संकटाच्या काळात शिवसेनेची तारणहार ठरलेल्या अखिल भारतीय सेनेचेच हात यंदाच्या महापालिका निवडणुकीत दगडाखाली आले आहेत़. गवळी कुटुंबाचा दरारा असलेल्या या मुस्लीमबहुल भागात एमआयएमचे आव्हान उभे राहिले आहे. त्यात भरीस भर म्हणून युती तुटल्यामुळे शिवसेना व भाजपासोबत त्यांचा सामना होणार आहे़ त्यामुळे अभासेचा गड धोक्यात आला आहे.
गुन्हेगारी जगतात एकेकाळी दरारा असलेल्या अरुण गवळी यांनी २० वर्षांपूर्वी या पक्षाची स्थापना केली. गवळी यांच्या वहिनी वंदना गवळी व मुलगी गीता गवळी भायखळा प्रभाग २०४ आणि २०५मधून महापालिकेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आल्या आहेत. आत्तापर्यंत अभासेची येथे एक हाती सत्ता होती. म्हणूनच शिवसेनेनेही या पक्षाला जवळ केले होते. मात्र गेल्या एक-दोन वर्षांत या मैत्रीत वितुष्ट निर्माण झाले. त्यात विधानसभा निवडणुकीत एमआयएमने अनपेक्षितपणे दणका दिला. यामुळे शिवसेनेसाठी या पक्षाचे महत्त्व कमी झाले. शिवसेना-भाजपा युती तुटल्यामुळे या प्रभागांत दोन्ही पक्षांचे स्वतंत्र उमेदवारही आहेत. त्यात प्रभाग फेररचनेत ६० टक्क्यांहून अधिक भाग हा मुस्लीमबहुल आहे. या प्रभागात एमआयएमचे वाढते महत्त्व अभासेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. राष्ट्रवादीने गवळी यांच्या प्रभागात उमेदवार दिलेला नाही.
या बंडोबांचे आव्हान कायम
पक्षाने डावलल्यामुळे दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या या वेळेस अधिक आहे. या बंडोबांना अन्य पक्षांचे तिकीटही मिळाल्याने हे बंडोबा थंड होणारे नाहीत. यापैकी काही बंडोबा त्या-त्या प्रभागात वजनदार असल्याने पक्षाचे अधिकृत उमेदवार अडचणीत आले आहेत. त्यामुळे या बंडोबांना थंड करण्याऐवजी विजयासाठी नवी व्यूहरचना राजकीय पक्षांना आखावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
आज ठरणार अंतिम लढती : आॅनलाइन अर्जांच्या गोंधळात १४० उमेदवार बाद ठरल्यानंतर २६३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात ऐनवेळी तिकीट कापल्यामुळे बंडाचे निशाण फडकवून अपक्ष अर्ज दाखल करणारेही आहेत. या बंडोबांना थंड करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पक्षात महत्त्वाच्या पदांचे व पुढच्या निवडणुकीचे आमिष दाखवून त्यांचे मन वळविण्याचे काम वरिष्ठ नेते करीत आहेत. मात्र यापैकी किती बंडोबा आपली तलवार म्यान करीत अर्ज मागे घेतात याकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे.