मुंबई : मराठीशाळा आणि मराठी भाषा विषयासाठी मराठी अभ्यास केंद्र ही संस्था सुरुवातीपासून लढा देत आहे. आता मराठी अभ्यास केंद्र आणि ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने बृहन्मुंबई क्षेत्रातील शाळांची सांख्यिकी जाणून घेण्यासाठी आणि मराठी शाळांमधील यशवंतांची यादी तयार करण्यासाठी एक प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामध्ये मुंबईतील प्रत्येक शाळेला भेट देऊन माहितीचे संकलन केले जाणार आहे. ही माहिती अहवाल स्वरूपात सार्वजनिक करण्याचा ‘मराठी अभ्यास केंद्रा’चा मानस असून, मुंबईतील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना व संस्थाचालकांना आवाहन माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.मराठी अभ्यास केंद्र ही मराठी भाषा, समाज व संस्कृती यांच्या संवर्धनाचे कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेमार्फत विविध स्वरूपाचे संशोधन व अभ्यास प्रकल्प हाती घेतले जात असून, आजवर संस्थेने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबविलेले आहेत. मुंबईमध्ये शालेय शिक्षणाची सोय कशा प्रकारची आहे, एकूण किती व कशा प्रकारच्या शाळा आहेत, कोणकोणत्या माध्यमांतून येथे शिक्षण दिले जाते, त्यांचे व्यवस्थापन कोणाकडे आहे, अनुदानाचे स्वरूप कसे आहे, शिक्षकांची संख्या, विद्यार्थी पटसंख्या, पटसंख्या वाढते की घटते, याविषयी एकत्रित व अद्ययावत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे हे सर्वेक्षण हाती घेण्यात येणार आहे.तसेच मराठी शाळांमध्ये शिकूनही उत्तम करियर करता येते, याविषयी अनेक पालकांच्या मनात शंका असतात. मराठी माध्यमात शिकूनही आपापल्या क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करता येते, ही माहिती लोकांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे या सर्वेक्षणातून संकलित करण्यात येणारी माहिती शासन, प्रशासन आणि मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, असं वाटणाऱ्या मराठीप्रेमी नागरिक या सर्वांच्याच उपयोगी येणारी आहे. या माहितीच्या संकलनासाठीच मराठी अभ्यास केंद्राकडून मराठी शाळांची माहिती गोळा करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.प्रत्येक शाळेला देणार भेटमराठी अभ्यास केंद्र आणि ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने जाणाºया या प्रकल्पाचे विलास डिके (८८०५७९३०७०) हे माहिती - संकलक असून, ते मुंबईतील प्रत्येक शाळेला भेट देऊन माहितीचे संकलन करणार आहेत. यासाठी सर्व शाळांतील मुख्याध्यापकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मुंबईतील मराठी शाळांचे होणार सर्वेक्षण, माहिती देण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 6:57 AM