Join us

विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 10:08 PM

मुंबईसह राज्यात येत्या १८ ते २० मे दरम्यान दारूची दुकाने बंद राहणार आहेत.

- श्रीकांत जाधव

मुंबई : भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, ज्या मतदारसंघात निवडणूक होणार आहे आणि त्या मतदारसंघाच्या नजीकच्या मतदारसंघात ‘ड्राय डे’ पाळणे आवश्यक असते. त्यानुसार मुंबईसह राज्यात येत्या १८ ते २० मे दरम्यान दारूची दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे तीन दिवस मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान आहे. सोमवारी २० मे रोजी मुंबईसह पालघर, कल्याण आणि ठाणे या प्रमुख शहरांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यामुळे शनिवार, रविवार आणि पुढील आठवड्यात सोमवारपर्यंत दारूची दुकाने आणि बार बंद राहणार आहेत. मतदानानिमित्त प्रशासनाने १८ ते २० मे दरम्यान या मतदारसंघांमध्ये ‘ड्राय डे’ पाळला जाणार आहे. 

निवडणूक काळात घोषित करण्यात आलेल्या ‘ड्राय डे’ काळात छुप्या पद्धतीने मद्य साठा करणे, मद्याचा काळा बाजार करणे, वाढीव भावाने दारू विक्री, अवैध मद्य वाहतूक करणे तसेच मतदानासाठी दारूचे आमिष दाखवणे किंवा खास मतदारांसाठी दारू पार्ट्या आयोजित करणे मोठा अपराध असतो. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांसह उत्पादन शुल्क विभागाकडून खास तपासणी केली जात  आहे. 

दारू दुकाने कधी बंद राहणार मुंबई शहरात १८ मे रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून दारूची दुकाने आणि बार बंद राहणार आहेत. त्यानंतर, १९ मे रोजी पूर्ण दिवस बंद राहतील आणि २० मे रोजी संध्याकाळी ६ नंतर उघडतील. तसेच ४ जून रोजी मतमोजणीच्या वेळी मुंबईत पुन्हा ‘ड्राय डे’ जाहीर करण्यात आला आहे. 

टॅग्स :मुंबई