मुंबई : उत्तरेकडील पश्चिमी विक्षोभ, अरबी समुद्रातून येणारी आर्द्रता व पुढील चार ते पाच दिवस अरबी व बंगालच्या उपसागरातून एकत्र येणारे वारे; याचा प्रभाव म्हणून १० ते १३ जानेवारीदरम्यान उत्तर पश्चिम व मध्य भारतात हलका ते मध्यम पाऊस पडेल. १० जानेवारी रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वातावरण राहील. वादळासह गारा पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
राज्यातील उल्लेखनीय हवामान बदलामुळे बहुतांश भागात अवकाळी पावसाचा तडाखा सुरू असून, पुढील काही दिवस असेच वातावरण राहणार आहे. विशेषत : विदर्भ आणि मराठवाडा येथे अवकाळी पावसाचा अंदाज अधिक वर्तविण्यात आला आहे. मुंबईतदेखील शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर रविवारी मात्र येथील आकाश मोकळे झाले आणि ऐन दुपारी मुंबईकरांना उन्हाचा कडाका बसू लागल्याचे चित्र होते. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्याना सोमवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शिवाय लगतच्या जिल्ह्यासह मराठवाड्यातदेखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.