Join us

उपनगरात होणार दोन नवीन ‘ड्रग्ज ट्रीटमेंट सेंटर’

By admin | Published: June 26, 2016 4:27 AM

देशासह मुंबईतील तरुणाई विविध व्यसनांच्या आहारी जात आहे. या व्यसनांपासून तरुण आणि अन्य वयोगटातील व्यक्तींना लांब ठेवण्यासाठी जनजागृती करण्यात येते, पण ज्या व्यक्ती व्यसनांच्या

- पूजा दामले,  मुंबईदेशासह मुंबईतील तरुणाई विविध व्यसनांच्या आहारी जात आहे. या व्यसनांपासून तरुण आणि अन्य वयोगटातील व्यक्तींना लांब ठेवण्यासाठी जनजागृती करण्यात येते, पण ज्या व्यक्ती व्यसनांच्या आहारी गेल्या आहेत, अशा व्यक्तींना व्यसनांतून बाहेर काढण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या व्यसनमुक्ती कार्यक्रमांतर्गत उपक्रम राबविण्यात येतो. पुढच्या काही दिवसांतच या उपक्रमांतर्गत अंधेरीतील भरडा वाडी आणि घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात ‘ड्रग्ज ट्रीटमेंट सेंटर’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी दिली. ९०च्या दशकापासून केईएम रुग्णालयात व्यसनमुक्ती केंद्र सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी आरोग्य मंत्रालयाच्या उपक्रमांतर्गत केईएम रुग्णालयातील व्यसनमुक्ती केंद्रात तीन वर्षांपूर्वी ‘ड्रग्ज ट्रीटमेंट सेंटर’ची स्थापना करण्यात आली. हे प्रादेशिक केंद्र आहे. या केंद्रात १५० ते १७० जुने रुग्ण आहेत, तर रोज १५ ते २० नवीन व्यसनी व्यक्ती उपचारांसाठी येत असतात. मुंबईत सध्या दारूबरोबरच चरस, गांजा यांच्या व्यसनांचे प्रमाणही अधिक दिसून येते. व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनातून मुक्ती करून देणे इतके सोपे नसते. कारण या व्यक्ती फक्त व्यसनांच्या आहारी गेलेल्या नसतात, त्यांना मानसिक आजारही असतात. त्यावर उपचार करणे आवश्यक असते, असे डॉ. पारकर यांनी सांगितले. मेथाडोन पद्धतीने व्यसनाधीन असलेल्या व्यक्तींवर व्यसनमुक्ती केंद्रावर उपचार केले जातात. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात ही पद्धत वापरली जाते. व्यसन करणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूतील केमिकल्समध्ये बदल होतात. त्यांनी व्यसन सोडले, तरीही त्यांना व्यसन करण्याची तीव्र इच्छा होते. मेंदूत होणाऱ्या केमिकल्सच्या बदलामुळे त्यांना व्यसन केल्याशिवाय राहावत नाही. त्यामुळे त्यांना व्यसनांतून बाहेर काढण्यासाठी मेंदूतील केमिकल्स स्थिर करणे आवश्यक असते. पहिल्यांदा आलेल्या व्यक्तींना त्यासाठी औषधोपचार केले जातात. त्यानंतर, त्यांना सामाजिक जीवनात परत आणण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. कारण व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे त्यांचा सामाजिक आयुष्यातील संबंध दुरावलेले असतात, अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या असतात. त्यांना सामान्य आयुष्यात परत आणण्यासाठी समुपदेशन केले जाते. त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन केले जाते, असे डॉ. पारकर यांनी सांगितले.