मुंबई : राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाचा जागा वाढविण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली असून याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. राज्याची वाढीव जागांची मागणी पूर्ण लवकरच होण्याची शक्यता असून वर्षभरात एमबीबीएसच्या दोन हजार जागा वाढतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी विधान परिषदेत व्यक्त केला. याशिवाय, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने यंदा या प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू करता येणार नाही, असा आदेश न्यायालयाने दिला. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. पदव्युत्तर प्रवेशातील या घोळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत पुर्वलक्षी प्रभावाने आरक्षणाचा कायदा करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सदस्य हेमंत टकले यांनी याबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत केला.
आरक्षण लागू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे हे पहिलेच वर्ष होते. त्यामुळे अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी आल्या. मनस्ताप झाला हे मान्य करावे लागेल. मात्र सरकारने विद्यार्थी आणि पालकांना विश्वासात घेऊन पारदर्शी आणि प्रामाणिक भूमिकेतून प्रयत्न केल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या वर्षी आरक्षणानुसार प्रवेश मिळावा, यासाठी राज्य सरकारने न्यायालयात ताकदीने बाजू मांडली आहे. येत्या सोमवारी याबाबत शेवटचा निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडून सकारात्मक निकाल अपेक्षित असल्याचा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी विधानपरिषदेत व्यक्त केला.