Join us  

म्हणून भाजपने उद्धव ठाकरेंना वाघ दिला नाही ना !

By admin | Published: June 30, 2016 2:05 PM

गुरुवारी राज्याचे अर्थ आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना वाघाचा फायबरचा पुतळा भेट दिला.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३० - शिवसेना आणि भाजप या राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये सध्या संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज्याचे अर्थ आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना वाघाचा फायबरचा पुतळा भेट दिला. 
 
वनमंत्रालयाने राज्यात एक जुलैला वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव यांनी सुद्धा या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले. पण सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव यांना वाघाचा पुतळा भेट दिल्याने चर्चेला उधाण आले आहे. 
 
अलीकडे या दोन्ही पक्षांनी आपल्या लढाईत वाघ-सिंह या प्राण्यांनाही सोडले नव्हते.  काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि राज्यातील मंत्री प्रकाश मेहता यांनी मुंबईतले वाघ संपले असून आता गल्ली गल्लीत फक्त सिंह दिसेल असे वक्तव्य केले होते. 
 
शिवसेना नेहमीच आपल्यातील आक्रमकता दाखवण्यासाठी वाघाच्या प्रतिकाचा वापर करते. त्यासाठी मेहता यांनी हे खास विधान केले होते. या दोन्ही पक्षांमधील संबंधाने इतके टोक गाठले आहे की, दोन्ही पक्ष रस्त्यावर उतरुन परस्परांविरोधात नेत्यांचे पुतळे जाळण्याची आंदोलने करत आहेत. हे संबंध तुटेपर्यंत ताणू नयेत म्हणून तर, मुनगंटीवार यांनी शिवसेनेला प्रिय असणारा वाघ देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला नसेल ना !