...म्हणूनच मुंबईसह इतर शहरे जात आहेत पाण्याखाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 06:42 AM2018-07-16T06:42:42+5:302018-07-16T06:42:49+5:30
मुंबईतील बहुतांश क्षेत्राचे १०० टक्के काँक्रिटीकरण झाले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी पृष्ठभागावर साचते किंवा वाहते.
मुंबई : मुंबईतील बहुतांश क्षेत्राचे १०० टक्के काँक्रिटीकरण झाले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी पृष्ठभागावर साचते किंवा वाहते. जमिनीत मुरत नाही. परिणामी, पूर येतो. माहिमच्या खाडीची सागराचे व पावसाचे पाणी साठविण्याची क्षमता नष्ट झाली आहे. भरावात व त्यासाठी दगड व माती मिळविण्यासाठी केलेल्या डोंगराच्या नाशामुळे जैव विविधता नष्ट झाली आणि महापुराकडे वाटचाल होत असून, प्रत्येक भरावाने भरती रेषा जमिनीच्या दिशेने ढकलल्याने मुंबई व इतर शहरे बुडत आहेत, अशी माहिती भारतीय जीवन व पर्यावरण चळवळीचे निमंत्रक गिरीश राऊत यांनी दिली.
मागील तीन आठवड्यांपासून थांबून थांबून मुंबई शहर आणि उपनगरासह लगतच्या परिसरात तुफान पाऊस होत आहे. परिणामी, ठिकठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. विशेषत: मुंबई पावसाच्या पाण्याने तुंबत असून, याबाबत गिरीश राऊत यांनी सांगितले की, मुंबईच्या १९६४ सालच्या विकास आराखड्यातील गृहिताप्रमाणे अर्धा पाऊस जमिनीकडून शोषला जाईल. मात्र, मुंबईच्या काँक्रिटीकरणामुळे हे गृहीत मोडले गेले आहे. सन १९९८-९९ सालात आलेला महापालिकेचा पहिला पर्यावरण अहवाल म्हणतो की, मुंबईतील बहुतांश क्षेत्राचे १०० टक्के काँक्रिटीकरण झाले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी पृष्ठभागावर साचते किंवा वाहते. जमिनीत मुरत नाही. पूर येतो. ६४च्या पहिल्या विकास आराखड्यानुसार मुंबईत दर एक हजार माणसांमागे चार एकर जमीन, क्रीडांगणे वा उद्यानाच्या स्वरूपात मोकळी जागा हवी, परंतु सन १९९१ चा अहवाल म्हणतो की, मुंबईतील अशा मोकळ्या जागेचे प्रमाण कमी झाले आहे.
माहिमच्या खाडीची सागराचे व पावसाचे पाणी साठविण्याची अर्धी क्षमता सुमारे १ हजार एकर भराव करून नष्ट केली गेली. तेथून ते पाणी माहिम व वांद्रे या मूळ बेटांमधील माहिम कॉजवेच्या पुलाखालून पुढे माहिमच्या उपसागरात येणाऱ्या प्रभादेवी, दादर-शिवाजी पार्क, माहिम, वांद्रे भागांतील पाण्यासह वरळी व वांद्रे या भूशिरांमधील भागांतून अरबी समुद्रात शिरते. या पाण्याला ‘सी-लिंक’ प्रकल्प अडवतो. बर्फ वितळल्यामुळे होणाºया सागराच्या पातळीतील वाढीमुळे मुंबई, न्यूयॉर्कसह जगातील सर्व शहरी, ग्रामीण किनारपट्ट्या येत्या १५-२० वर्षांत पाण्याखाली जाणार आहेत.
मुंबईत २६ जुलै २००५ ला झालेली ऐतिहासिक वृष्टी व महापूर हा तापमानवाढीचा परिणाम होता. वांद्रे-कुर्ला संकुल, मिठी नदीवर व अर्थातच खाडीतील सर्वात खोल भागावर बांधले आहे. ते बुडू नये, म्हणून त्याची व त्यातील रस्त्याची उंची वाढविली. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून आणणारे उत्तरेकडील कलानगर, सरकारी वसाहत भाग खालच्या पातळीला गेले.
>डोंगरांचा नाश येणार अंगलट
१७८४ सालात वरळी व गिरगाव ही बेटे जोडणाºया सागरातील पहिल्या भरावाचे (रेसकोर्सपासून पायधुनीपर्यंत) काम सुरू झाले. हा विकास हीच दुर्घटना होती. प्रत्येक भरावात व त्यासाठी दगड व माती मिळविण्यासाठी केलेल्या डोंगराच्या नाशामुळे सागरातील व डोंगरावरील असाधारण जंगल व जैव विविधता नष्ट झाली; आणि महापुराकडे वाटचाल होत राहिली. मुंबईच्या बहुतेक भागांतील पर्जन्य व मलनिस्सारण यंत्रणा सन १९३० व ४० च्या दरम्यान बांधली गेली. या यंत्रणांच्या, पाणी बाहेर सोडणाºया मुखांपासून काही अंतरावर सर्वात मोठ्या भरतीच्या पाण्याची रेषा होती. विकासाच्या नशेत सागरात भराव होतच राहिले. या यंत्रणा बांधल्यानंतरच्या प्रत्येक भरावाने भरती रेषा जमिनीच्या दिशेने ढकलली गेली व पुराच्या दिशेने वाटचाल झाली, असेही राऊत यांनी सांगितले.
माहिमच्या खाडीची सागराचे व पावसाचे पाणी साठविण्याची अर्धी क्षमता सुमारे १ हजार एकर भराव करून नष्ट केली गेली.
६४ च्या पहिल्या विकास आराखड्यानुसार मुंबईत दर एक हजार माणसांमागे चार एकर जमीन, क्रीडांगणे वा उद्यानाच्या स्वरूपात मोकळी जागा हवी, परंतु सन १९९१ चा अहवाल म्हणतो की, मुंबईतील अशा मोकळ्या जागेचे प्रमाण कमी झाले आहे.