Join us  

... म्हणून प्रकाश आंबेडकरांविरुद्ध उमेदवार दिला; पटोलेंनी सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 7:54 PM

प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातून स्वत:ची उमेदवारी जाहीर केल्यानंतर, काँग्रेससह महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईत झाला. यावेळी, मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर मोठी जाहीर सभाही झाली. या सभेला काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. याच व्यासपीठावरुन प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि भाजपावर हल्लाबोल केला. त्यामुळे, वंचित बहुजन आघाडी नक्कीच महाविकास आघाडीत सहभागी होईल, असे चित्र निर्माण झाले होते मात्र, महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता. त्यामुळे, प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये, प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून निवडणुकांच्या मैदानात उतरले आहेत. 

प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातून स्वत:ची उमेदवारी जाहीर केल्यानंतर, काँग्रेससह महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण, लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी मविआपासून दूर झाल्याचं स्पष्ट झालं. पहिल्या यादीत पूर्व विदर्भातील मतदारसंघाचा समावेश होता तर दुसऱ्या यादीत वंचितनं मराठवाडा, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यातच, सोलापुरात प्रणिती शिंदेंविरुद्ध उमेदवार देण्यात आला आहे. तर, लातूरमध्येही नरसिंहराव उदगीरकर यांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळेच, काँग्रेसनेही प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध उमेदवारी देत जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात स्वत: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली. 

''मतांचं विभाजन होऊ नये यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीला मविआमध्ये सामील करण्यासाठी गेलो होतो. मात्र, त्यांनी आमची वारंवार चेष्टाच केलीय. असे असतानाही काँग्रेसच्या वतीने आम्ही आपली भूमिका पक्षश्रेष्ठींनी समजून सांगितली होती. आम्ही पूर्ण तयारीत देखील होतो. पण, त्यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आपले उमेदवार उभे करायचं काम सुरू केलं. याचा अर्थ त्यांना आमची साथ नको होती, हेच त्याच्यातून सिद्ध होतं. म्हणून आम्ही काल त्या ठिकाणी उमेदवार घोषित केला'', असं राज'कारण' नाना पटोले यांनी सांगितलं. 

वंचित विरुद्ध महाविकास आघाडी

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने सोलापूर, लातूर, माढा, सातरा आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघातून उमेदवार दिले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणजे काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराची डोकेदुखी असते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होते. त्यामुळेच, प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मात्र, आता वंचित विरुद्ध महाविकास आघाडी असाही सामना लोकसभा निवडणूक २०२४ मध्येही पाहायला मिळणार आहे.  

टॅग्स :नाना पटोलेकाँग्रेसलोकसभा निवडणूक २०२४भाजपाप्रकाश आंबेडकर