मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यात माहिमच्या समुद्रात झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत व्हिडिओ दाखवण्यात आला. प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे गेल्या २ वर्षात समुद्रात कथित मजार उभारण्यात आली. त्याठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आले असा दावा राज ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे, राज ठाकरेंचा हा मेळावा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. तत्पूर्वी मेळाव्याची मोठी उत्सुकता मनसैनिकांना आणि महाराष्ट्रातील जनतेला होती. तर, मनसैनिकांमध्ये मोठा उत्साह राज यांच्या सभेपूर्वीच पाहायला मिळाला. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून राज यांचा उल्लेखही डिजिटल बॅनरवर झळकला होता.
राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडतील असे म्हटले. विशेष म्हणजे ते जनतेच्या मनातील मुख्यमंत्री का आहेत, याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. प्रत्येक वेळेला कुठल्याही सामान्यातील सामान्य माणसालाही अडचण येते तेव्हा ते राज ठाकरेंकडे येतात. यापूर्वी कृष्णकुंजवर यायचे, आता शिवतिर्थवर येतात. मला वाटतं आमच्यासाठी ती पोजिशन खूप मोठीय, त्यामुळे लोकांच्या मनातील मुख्यमंत्री ते आहेत, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं. तसेच, त्यांनी जी ब्लू प्रिंट तयार केलीय, ती पूर्ण करण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री व्हायला लागेल, असेही शर्मिला यांनी म्हटलं.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी दादर परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यात शिवसेना भवनासमोरील एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले. जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे असा उल्लेख त्या बॅनरवर करण्यात आलेला आहे. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी हा बॅनर सभास्थळी लावला होता. त्यावरुन, पत्रकारांनी शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारला होता. त्यावर, त्यांनी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, राज ठाकरे हे आधीपासूनच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री होते आणि यापुढेही राहणार आहेत, असे अमित ठाकरे यांनी म्हटले.