Join us

त्यामुळेच शिवसेना आजही सत्तेत, उद्धव ठाकरेंनी सांगितली 'राज की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 10:33 AM

शिवसेना नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधारी भाजपवर टीका करते. शिवसेनेच्या या भूमिकेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नेहमीच प्रश्न विचारला जातो. पण..

मुंबई - शिवसेना नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्ताधारी भाजपवर टीका करते. शिवसेनेच्या या भूमिकेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नेहमीच प्रश्न विचारला जातो. सोशल मीडियातूनही शिवसेनेला नेटीझन्स टार्गेट करतात. आता, या प्रश्नाचे उत्तर उद्धव ठाकरेंनी दिले आहे. काय म्हणून सत्ता सोडावी, आम्ही सत्तेत राहूनच सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवत असल्याचे त्यांनी म्हटले. सत्तेत राहूनच आम्ही सरकारला कामे करण्यास भाग पाडत आहोत. आम्ही मोदींच्या स्वप्नासाठी नाही, तर सर्वसामान्यांच्या स्वप्नासाठी लढतोय, असेही उद्धव यांनी म्हटले. 

आपण तर काहीच सोडायला तयार नाही ? असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारला होता. त्यावर उत्तर देताना, काय सोडायचं आणि काय म्हणून सोडायचं? आमच्या हातात जेवढी सत्ता आहे ती आम्ही लोकांसाठी वापरतोय. सरकारवर अंकुश ठेवून कर्जमुक्ती करायला लावली. शिवसेनेच्या दबावामुळेच मुंबईसह राज्यातील 27 महापालिकांचा महसूल आम्ही सुरक्षित ठेवला. जीएसटीच्या कक्षेतून हा महसूल वगळला. अन्यथा, सर्वांनाच हातात कटोरा घेऊन मंत्रालयाच्या दाराबाहेर उभे राहयची वेळ आली असती, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. तसेच जशी चाणक्यनीती आहे, तशी माझीही वेगळी नीती आहे. जर सत्ताधाऱ्यांची चाणक्यनीती तुम्हाला मान्य असेल, तर माझी नीतीही तुम्हाला मान्य करावीच लागेल. मात्र, ही उद्धवनीती वगैरे नाही, माझं नाव लावावं एवढा मोठा मी नाही. कारण, मी अद्याप वेगळा नीती आयोग स्थापन केला नाही. पण माझी नीती वेगळी आहे. तुम्हीच सांगा आज कोणत्या नितीमुळे देशाची वाट लागलीय ? चाणक्यनितीमुळे की माझ्यानितीमुळे असा प्रश्नही उद्धव यांनी सरतेशेवटी मुलाखतकार संजय राऊत यांना विचारत आपली भूमिका स्पष्ट केली.

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीससंजय राऊतशिवसेनाभाजपा