तिथे एक बॉम्ब आहे, मला बाहेर काढा...; महिलेचे नियंत्रण कक्षात १५ दिवसांत ३८ कॉल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 06:34 AM2023-09-06T06:34:12+5:302023-09-06T06:34:20+5:30
एका महिलेने १५ दिवसांत तब्बल ३८ कॉल केल्याचे समोर आले आहे.
मुंबई : दहीहंडी, गणपती बंदोबस्ताची तयारी सुरू असतानाच नियंत्रण कक्षात येणारे बॉम्ब हल्ल्यासंबंधित खोटे कॉल पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत. गेल्या २४ तासांत मुंबईपोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बॉम्ब ठेवल्याबाबत दोन कॉल आले. यामध्ये, तिथे एक बॉम्ब आहे. मी खूप घाबरली असून मला बाहेर काढा, पोलिस मदत हवी आहे, असे बोलून एका महिलेने १५ दिवसांत तब्बल ३८ कॉल केल्याचे समोर आले आहे.
कॉल करणारी महिला मलबारहिल परिसरातील असूनसोमवारी तिने कॉल करून कुलाबा व नेपियन सी रोडवर बॉम्ब असल्याचा दावा करत पोलिस मदत मागितली. चौकशीत या महिलेने गेल्या ३८ वेळा कॉल केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, चौकशी करताच ती काहीही माहिती देत नसल्याने पोलिसांच्या डोकेदुखीत भर पडत आहे.
नागपाडा येथील कामाठीपुरा गल्ली क्रमांक १२ मध्ये बॉम्ब ठेवल्याच्या माहितीचा दुसरा कॉल आला. पोलिसांनी तपास सुरू केला. नागपाडा पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने दिलीप राऊत (३३) या व्यक्तीला अटक केली आहे. तो कामगार असून, तणावातून नशेत त्याने हा कॉल केल्याचे पोलिसांना सांगितले.