मुंबई : कोरोना विषाणूचा (कोविड - १९) प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नौकावहन मंत्रालयाने उपाययोजनांची व्याप्ती वाढविली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये जानेवारी २०२० पासून १ हजार ५८८ जणांची थर्मल तपासणी करण्यात आली. यात एकही संशयित आढळला नसल्याचे सांगण्यात आले.मुंबई बंदरात जानेवारीपासून आतापर्यंत २६८ मालवाहू (कार्गो) जहाजांचे आगमन झाले. त्यामधून आलेल्या ७ हजार ७७३ कर्मचाऱ्यांपैकी १४ दिवसांमध्ये कोरोना प्रादुर्भाव झालेल्या देशांचा प्रवास केलेल्या १,२४७ जणांची थर्मल तपासणी (स्क्रीनिंग) करण्यात आली. याच कालावधीत ९ प्रवासी जहाजांचे मुंबई बंदरात आगमन झाले. त्यामधून आलेल्या १४ हजार ५०० प्रवासी आणि ७ हजार ०२३ कर्मचाऱ्यांपैकी ३४१ जणांची थर्मल तपासणी करण्यात आली; कारण त्यांनी १४ दिवसांत कोरोना प्रादुर्भाव झालेल्या देशांचा प्रवास केला होता. अशा प्रकारे एकूण १ हजार ५८८ जणांची थर्मल तपासणी झाली. मात्र यात एकही संशयित आढळून आला नसल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाºयांनी दिली.जानेवारी महिन्यात केवळ चीनमधून येणाºया प्रवाशांची थर्मल तपासणी केली जात होती. आता या तपासणीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आणखी देशांचा समावेश केला आहे. सोबतच चीनसह इटली, कोरिया, दक्षिण कोरिया, जपान या देशांच्या नागरिकांना जारी केलेले व्हिसा, ई-व्हिसा रद्द करण्यात आले आहेत.>उपाययोजनांवर भरनौकावहन मंत्रालयाचे सचिव गोपाळकृष्ण यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचावासाठी घ्यायच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. सध्या मुंबई पोर्ट ट्रस्टकडे थर्मल अॅनालायझर आहे. क्रुझ टर्मिनलमध्ये येणाºया प्रवाशांच्या सोयीसाठी मोठ्या आकाराचे व क्षमतेचे थर्मल अॅनालायझर पुढील चार-पाच दिवसांत येण्याची शक्यता आहे. यामधून प्रवासी गेल्यावर त्यांना काही लागण झाली आहे का हे त्वरित कळेल. या तपासणीसाठी त्यांना रांंग लावावी लागणार नाही. कोरोनापासून बचावासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.- संजय भाटिया,अध्यक्ष, मुंबई पोर्ट ट्रस्ट
मुंबई बंदरात १ हजार ५८८ जणांची थर्मल तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 4:52 AM