हे आहेत मुंबईतील कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:08 AM2021-02-18T04:08:42+5:302021-02-18T04:08:42+5:30
बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूरमध्ये रुग्णवाढ लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लोकल सेवा सुरू झाल्यापासून मुंबईतील काही ...
बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूरमध्ये रुग्णवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकल सेवा सुरू झाल्यापासून मुंबईतील काही भागांमध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळकनगर हे भाग पुन्हा कोरोनाचे हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे बाधित रुग्ण आढळून आलेल्या ८५ चाळी-झोपडपट्टी आणि ९९२ इमारती प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत.
गेल्या महिन्यात दररोज सरासरी तीनशे रुग्ण आढळून येत होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून ही संख्या दररोज ६०० वर पोहोचली आहे. मुंबईतल्या काही भागांत रुग्णांची संख्या वाढली असून, कोरोनाचे नवे हॉटस्पॉट समोर आले आहेत.
* बोरिवलीत सर्वाधिक ४०८ बाधित रुग्ण सापडले, तर अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम, विलेपार्ले पश्चिम या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या ३७८ वर पोहोचली आहे. या परिसरातील १०० इमारती सील करण्यात आल्या आहेत.
* कांदिवली, चारकोपमध्ये ३४५, तर मालाड, मनोरी इथे ३३८ कोरोना रुग्ण आहेत. मुलुंडमध्ये २९२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथे २०२ इमारती सील करण्यात आल्या आहेत.
* घाटकोपर, विद्याविहार आणि पंतनगर या भागातील १६२ इमारती सील करण्यात आल्या. १४ झोपडपट्ट्या आणि चाळी बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. येथे २८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
* भांडुप, पवई, कांजूरमार्ग, विक्रोळी, नाहूर येथील १० झोपडपट्ट्या आणि चाळी बाधित आहेत. माहीममध्ये बुधवारी १७ बाधित रुग्ण सापडले.