हे आहेत खरे हिरो...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 06:25 PM2020-08-27T18:25:21+5:302020-08-27T18:26:01+5:30
सफाई कर्मचारी, जीवरक्षक हेच खरे हिरो आहेत
मुंबई : आपल्या असे वाटते किंवा भासते की चित्रपटात दिसणारेच खरे हिरो असतात. प्रत्यक्षात तसे नसते. तर कोरोनाच्या काळातही मुंबईला स्वच्छ ठेवणारे सफाई कर्मचारी आणि गणेश मूर्ती विसर्जन प्रक्रियेत लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आपणहून स्वत: पुढ येत गणेश मूर्तींचे विसर्जन करणारे जीवरक्षक हेच खरे हिरो आहेत; आणि हे त्यांचे काम पाहिल्यानंतर लक्षात येते.
कुर्ला पश्चिमेकडील श्री छत्रपती शिवाजी महाराज तलाव येथे एल वॉर्ड अतंर्गत ६० जीवरक्षक आणि २० सफाई कर्मचारी नेमण्यात आले आहेत. सायबू गाडगे नावाचा तरुण या जीवरक्षकांसह सफाई कर्मचा-यांचे नेतृत्व करत असून, गणेशोत्सव सुरु झाल्यापासून हे खरे हिरो आपले कर्तव्य कुठलाच गाजावाजा न करता पार पाडत आहे. दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन असो, पाच दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन असो किंवा गौरी गणपतीचे विसर्जन असो; या प्रत्येक प्रक्रियेत हे जीवरक्षक आपले काम इमाने इतबारे करत आहेत. तैनात पोलीसांना मदत करत आहेत. गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी घेऊन येणा-या गणेश भक्तांना मदत करत आहेत. कोणताच गणेश भक्त गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी थेट तलावात उतरणार नाही याची काळजी घेत आहेत. विसर्जनादरम्यान कुठलीच अडचण येणार नाही याची खबरदारी घेत आहेत.
२० सफाई कर्मचारी येथील परिसर कसा स्वच्छ राहील? याकडे लक्ष देत आहेत. जंतु नाशकाच्या फवारणीसह निर्माल्यदेखील खाली पडलेले दिसणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जात आहे. तलावास दोन प्रवेशद्वार असून, शीतल सिनेमा गृहालगतच्या प्रवेशद्वारा ४० जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. येथे ३ जर्मन तराफे आहेत. १ मोटारबोट आहे. मगन नथुराम मार्गावरील प्रवेशद्वारावर २० जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. येथे २ जर्मन तराफे आहेत. आणि २० सफाई कर्मचारी पुर्ण तलावासह भोवती कार्यरत असून, कोरोनाच्या काळात आपली कर्तव्य चोख बजावत आहेत.