Join us

हे आहेत उत्तर पश्चिम मुंबईचे राजकारणातील दिग्गज चित्रपट अभिनेते

By मनोहर कुंभेजकर | Published: March 28, 2024 9:56 PM

Lok Sabha Election 2024: प्रसिद्ध अभिनेता व माजी खासदार गोविंदा यांनी आज सायंकाळी बाळासाहेब भवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.त्यांचा शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून समावेश करण्यात आला आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - प्रसिद्ध अभिनेता व माजी खासदार गोविंदा यांनी आज सायंकाळी बाळासाहेब भवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.त्यांचा शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून समावेश करण्यात आला आहे.याबाबत माजी आमदार आणि शिंदे गटाचे उपनेते-प्रवक्ते कृष्णा हेगडे यांनी गोविदां यांचे पक्षात स्वागत केले आहे.त्यांनी काल सायंकाळी गोविदा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून सुमारे सव्वा तास त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती.

गोविंदा हे उत्तर मुंबईचे खासदार होते आणि 2004 च्या लोकसभा निवडणुकीत पाच वेळा खासदार असणारे माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांचा पराभव करणारे ते जायंट किलर होते अशी माहिती त्यांनी दिली. उत्तर पश्चिम मुंबई 2009 पूर्वीचा जुना मतदार संघ आणि 2009 नंतर च्या नव्या मतदार संघातील अनेक प्रसिद्ध दिग्गज अभिनेत्यांनी लोकसभेत आणि राज्यसभेत खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे.

यामध्ये सुनील दत्त हे 1984, 1989, 1991, 1999, 2004 साली पाच वेळा  उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी यापूर्वी अभिनेत्री असतांना वर्सोव्याला राहात होत्या. तर दिलीप कुमार , नर्गिस , राजेश खन्ना,धर्मेंद्र, सनी देओल, शत्रुघ्न सिन्हा, विनोद खन्ना, हेमा मालिनी, शबाना आझमी, राज बब्बर, दारा सिंग, अमिताभ बच्चन  आणि जया बच्चन,स्मृती इराणी यांसारख्या  चित्रपटसृष्टीतील राज्यसभेतील अनेक दिग्गज व्यक्तिमत्व ही उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातील रहिवासी आहेत.

तसेच एनटीआर , एमजीआर, जयललिता आणि करुणानिधी यांच्या सारखे चित्रपट उद्योगातील प्रसिद्ध अभिनेते त्यांच्या राज्यात मुख्यमंत्री झाले. राजकारणातील चित्रपट व्यक्तिमत्त्वे ही काही नवीन घटना नाही. त्यांच्यापैकी काहींनी त्यांच्या राज्यातील नागरिकांसाठी देखील अपवादात्मक कार्य केले आहे अशी माहिती कृष्णा हेगडे यांनी दिली.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४मुंबई उत्तर पश्चिम