‘या’ नागरिकांचे मतदान १० दिवस आधीच होणार; गृह मतदानाचाही पर्याय
By संतोष आंधळे | Published: April 17, 2024 08:07 AM2024-04-17T08:07:46+5:302024-04-17T08:07:58+5:30
निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच दिव्यांग आणि ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी गृह मतदानाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच दिव्यांग आणि ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी गृह मतदानाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्या सर्वांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. घरी मतदान करणाऱ्यांना मतदानाच्या दहा दिवस आधी मतदान करता येईल. मुंबई, ठाण्यासह १३ ठिकाणी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. त्याअगोदर ९ ते १९ मेपर्यंत पात्रताधारक व गृह मतदानाचा पर्याय स्वीकारलेल्या व्यक्तीच्या घरी निवडणूक अधिकारी भेट देणार आहेत.
संबंधित मतदाराच्या घरी एक छोटेखानी मतदान केंद्र तयार करणार आहेत. अंतिम नावांची मतपत्रिका, मतदान स्वीकारण्यासाठी सील मतपेटी तेथे असेल. मतदान गोपनीय राहण्यासाठी पुठ्ठ्यांचे वेष्टन लावण्यात येणार आहे. पसंतीच्या उमेदवाराला मतदान करून मतपत्रिका सीलबंद मतपेटीत त्यांनी टाकायची आहे. या सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंग करण्यात येणार आहे. निवडणूक अधिकारी, दोन सहायक मतदान अधिकारी, पोलिस, व्हिडीओग्राफर आणि संबंधित पक्षाचे पोलिंग एजंट तेथे उपस्थित राहतील. १ मेपर्यंत गृह मतदानाची यादी तयार केली जाणार आहे.
८५ पेक्षा अधिक वयाचे किती मतदार?
मुंबई शहरात मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ येतात. त्यात १० विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये ८५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांची संख्या ५५,७६६ इतकी आहे, तर दिव्यांगांची संख्या ५,४३७ इतकी आहे.
संबंधित पद्धतीचे पहिल्यांदाच मतदान होत आहे. हे काहीसे जोखमीचे असले, तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने आमची सर्व तयारी झाली आहे. गृह मतदानासाठी पात्र असलेल्या किती मतदारांनी हा पर्याय स्वीकारला आहे. त्याची यादी तयार झाल्यावर त्या दृष्टीने टीम तयार करण्यात येतील. ठरलेल्या दहा दिवसांत त्यांचे मतदान करून घेण्यात येईल. - संजय यादव, जिल्हाधिकारी, मुंबई
पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघ
मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, धुळे, दिंडोरी, नाशिक.