मुंबई : उन्हाळी परीक्षांच्या पेपर तपाणीसाठी प्राध्यापकांनी वेळ द्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी केले आहे. मात्र, प्राध्यापकांच्या बुक्टू संघटनेकडून याचा निषेध करत फोर्ट कँपस येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारातच आंदोलन केले. दरम्यान, अकॅडमिक कौन्सिलची बैठक बोलावून जूनमध्ये महाविद्यालये उशिरा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याचे आश्वासन कुलगुरूंनी आंदोलनकर्त्या संघटनेला दिले आहे. त्यामुळे यंदा महाविद्यालये उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे.
निकाल वेळेत लागावा यासाठी प्राध्यापकांनी उन्हाळी सुट्टीवर न जाता उत्तरपत्रिका तपासण्याचे काम करावे, असे आवाहन विद्यापीठाने केले. यामुळे प्राध्यापकांची सुट्टी वाया जात असल्याने बुक्टूने निदर्शने केली. आंदोलनकर्त्यावर दबाव आणण्यासाठी विद्यापीठाने पोलिसांना बोलावले. या कृतीचाही प्राध्यापकांनी निषेध केला. दरम्यान, कुलसचिव अजय देशमुख यांनी याबद्दल संघटनेची माफी मागितली.
आंदोलनादरम्यान संघटनेच्या शिष्टमंडळाशी कुलगुरुंनी चर्चा करून महाविद्यालये उशिरा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे प्राध्यापकांना हक्काची उन्हाळी सुट्टी मिळेल, अशी आशा असल्याचे बुक्टूचे अध्यक्ष गुलाबराव राजे म्हणाले.