Join us  

त्यातल्या त्यात शिवसेनाच बरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2015 10:49 PM

येथील नगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या दोन्ही ठिकाणी शिवसेना सत्तेवर येणार हे आता स्पष्ट झाले आहे.

बदलापूर /अंबरनाथ : येथील नगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या दोन्ही ठिकाणी शिवसेना सत्तेवर येणार हे आता स्पष्ट झाले आहे. मतदारांनी जो कौल दिला आहे त्याचा स्पष्ट अर्थ सर्व राजकीय पक्ष सारखेच आहेत, परंतु त्यातल्या त्यात शिवसेना आम्हाला बरी वाटते. कारण तिची, तिचे कार्यकर्ते, नगरसेवक, नेते यांची नाळ आमच्याशी जोडली गेली आहे, असा आहे. त्याचबरोबर मतदारांनी सर्वच राजकीय पक्षांना या निकालाद्वारे सुप्त संदेशही दिला आहे. तुम्ही निवडणुकीपूर्वी एकमेकांवर जी टीका करतात अगदी वस्त्रहरण करण्याचा आव आणतात ते सगळे ढोंग असते. कारण निवडणूक संपली की, सत्तेसाठी तुम्ही पुन्हा एकमेकासोबत झिम्मा घालायला सज्ज असता. तुमच्या आघाड्या आणि युत्या यालाही आम्ही किंमत देत नाहीत. कारण जे मतदानापूर्वी घडते. ते मतदान झाल्यानंतर तसेच राहील, असे क्वचितच घडते. त्यामुळे आघाड्या, युत्या याला मतदारांनी किंमत दिलेली नाही.भाजपने स्वबळावरची भाषा केली. परंतु उमेदवारी देताना आपले कार्यकर्ते सोडून आयाराम-गयारामांना भरपूर उमेदवाऱ्या दिल्या. त्यामुळे दोनही पालिकात मतदारांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. अगदी प्रारंभापासून एकला चलो रे ही जी भूमिका शिवसेनेने घेतली आणि उमेदवाऱ्यांच्या वाटपातही आपल्या शिलेदारांना प्राधान्य दिले. त्याचा फायदा तिला या दोनही ठिकाणच्या निवडणुकीत झाला. आणि ती सत्तेवर आली. राज्यात आणि केंद्रात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी जशी मोदी लाट होती तशी या निवडणुकीत निर्माण होईल आणि आपण स्वबळावर सत्तेवर येऊ अशी भाजपाची अपेक्षा होती. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सेनेच्या या पालिकातील आजवरच्या निष्प्रभ कारकिर्दीबाबत आसूड ओढत होते. मोदी आणि फडणवीस सरकार कसे निकामी आहे याचा पाढा वाचत होते. परंतु प्रत्यक्षामध्ये मतदारांनी असा संकेत दिला की, लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणूक याचे इश्यू वेगळे असतात. त्यांची गल्लत तुम्ही करत असाल पण आम्ही करत नाही, त्यामुळे जे एका निवडणुकीत घडले ते सगळ्याच निवडणुकात घडेल असे समजू नका. त्यामुळे मोदी लाटेचे भाजपाचे स्वप्न मतदारांनी सेनेला सत्ता देऊन उद्ध्वस्त करून टाकले. सेनेला सत्ता मिळाली म्हणजे ती फार श्रेष्ठ असे तिने समजू नये. हे मतदारांनी तिला निसटते संख्याबळ देऊन स्पष्ट केले आहे. आमच्या दृष्टीने सगळेच पक्ष सारख्याच लायकीचे. त्यातल्या त्यात संघटना, तिच्यावर नेत्यांचे असलेले वर्चस्व आणि जनतेशी तिची जोडली गेलेली नाळ याबाबीत सेना काहिशी जवळची वाटते, असेही मतदारांनी दाखवून दिले आहे. (विशेष प्रतिनिधी)