या चिमण्यांनो, परत फिरा... मुंबईतील वाढत्या शहरीकरणात चिमण्यांसाठी जागाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 02:46 AM2018-03-20T02:46:15+5:302018-03-20T02:46:15+5:30

वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्या शहरातून स्थलांतरित होत असल्याचे मत पक्षिप्रेमी आणि निसर्गप्रेमींनी नोंदवले आहे. शहरीकरणाच्या ओघात शहरेच बकाल होऊ लागली आहेत. येथील जैवविविधता नष्ट केली जात आहे.

These sparrows come back, there is no place for sparrows in Mumbai's growing urbanization | या चिमण्यांनो, परत फिरा... मुंबईतील वाढत्या शहरीकरणात चिमण्यांसाठी जागाच नाही

या चिमण्यांनो, परत फिरा... मुंबईतील वाढत्या शहरीकरणात चिमण्यांसाठी जागाच नाही

Next

- अक्षय चोरगे

मुंबई : वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्या शहरातून स्थलांतरित होत असल्याचे मत पक्षिप्रेमी आणि निसर्गप्रेमींनी नोंदवले आहे. शहरीकरणाच्या ओघात शहरेच बकाल होऊ लागली आहेत. येथील जैवविविधता नष्ट केली जात आहे. चिमण्यांना पोषक असे वातावरण उरलेले नाही, खाद्य मिळत नाही, घरटी बांधायला जागा नाही; अशा विविध कारणांमुळे चिमण्या शहर सोडून शहराबाहेर स्थलांतरित होत आहेत.
चिमणी हा मनुष्यवस्तीमध्ये राहणारा पक्षी आहे. परंतु, शहरीकरण होत असताना चिमण्यांच्या राहण्याच्या जागा आणि अन्न नष्ट होत गेल्याने मुंबईतील चिमण्या स्थलांतरित होत आहेत. चिमण्यांचे पारंपरिक खाद्य मुंबईत उपलब्ध होत नाही. त्यामध्ये प्रामुख्याने जंगली गवत, गवताच्या बिया, त्या गवतामध्ये आढळणारे लहान किडे, झुरळ, पाली हे सहज आढळत नाही. त्यामुळे खाद्यासह निवारा शोधण्यासाठी चिमण्या मुंबई-ठाण्याच्या बाहेर वसई-विरार, खोपोली भागाकडे स्थलांतरित होत असल्याचे पक्षिप्रेमी सांगतात.

घरट्यांसाठी जागा नाही
चिमण्या घरटी बांधून राहतात. मात्र, घरटी बांधण्यासाठी मुंबईत जागाच उपलब्ध नाही. येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. मुंबईत पूर्वी कौलारू घरे होती. कौलांमध्ये चिमण्या घरटी बांधून राहत होत्या. कौलारू घरांऐवजी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्याने पक्ष्यांसाठी जागाच राहिली नाही. त्यामुळे चिमण्या स्थलांतरित होत आहेत.

मोबाइल रेडिएशनही कारणीभूत
शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मोबाइल टॉवर उभे राहत आहेत. त्यामधून निघणाऱ्या रेडिएशनचा चिमण्यांसह लहान पक्ष्यांवर परिणाम होतो, अशी भीती व्यक्त केली जाते. पक्षिप्रेमींनी याला दुजोरा दिला नसला तरी पक्षी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मोबाइल रेडिएशनमुळे पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.

कबुतरांचे अतिक्रमण
मुंबईत अनेक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यासाठी कबुतरखाने उघडले गेले आहेत. त्यामुळे मुंबईत कबुतरांचे प्रमाण वाढत आहे. शिवाय घार, कावळा आणि साळुंखी पक्ष्यांचे प्रमाणही वाढत आहे. हे पक्षी चिमण्यांच्या घरट्यांवर अतिक्रमण करून त्यांना हुसकावून लावतात. चिमण्यांच्या स्थलांतरणाला
हा घटकही
कारणीभूत
आहे.

पहिल्या पंधरा दिवसांतच पिल्लांचा मृत्यू
ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने केलेल्या अभ्यासात असे स्पष्ट झाले आहे की, बहुतांश चिमण्यांची पिल्ले १५ दिवसांच्या आत मरतात. पिल्लांची पचनसंस्था पहिल्या १५ दिवसांत खूपच नाजूक असते. अशा पिल्लांनी औषध फवारणी केलेले अन्नधान्य सेवन केल्यामुळे ती दगावतात.


येथे आहेत चिमण्या
सर्वाधिक चिमण्या मलबार हिल, कुलाबा, वांद्रे परिसरातील जुन्या वस्त्या, सात बंगला परिसर, मनोरी, कोळीवाडे, गावठाणे या परिसरात आढळतात. बांधकाम होत नसलेल्या, काही प्रमाणात वृक्ष असलेल्या परिसरात चिमण्या आढळतात.
कीटकनाशकांचा अतिवापर
अन्नधान्यावर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी त्यावर कीटकनाशकांची फवारणी केली जाते. या औषध फवारणीमुळे किडी नष्ट होतात, पण असे अन्नधान्य खाल्ल्यामुळे चिमण्या आणि प्रामुख्याने त्यांची पिल्ले मृत पावतात.

जैवविविधतेचेही होतेय नुकसान
चिमण्या गवताच्या बिया खातात. त्यामुळे गवताची
मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही. चिमण्या शेतातील
कीटक खातात. त्यामुळे शेतीवर कीटकांचा फारसा परिणाम होत नाही.
झुरळ, पाल या रोगराई पसरविणाºया कीटकांना चिमण्या खातात. त्यामुळे रोगराई नियंत्रणात राहते. झाडांवरील कीटक चिमण्या खातात. त्यामुळे झाडे सुरक्षित राहतात.

अशा येतील चिमण्या - ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे की, दाट मनुष्यवस्तीतही मेहंदी किंवा खजुराची झाडे लावली तर तेथे मोठ्या प्रमाणात चिमण्या येतात.

चिमण्यांसारख्या पक्ष्यांना मुंबईत राहण्यास जागा नसल्याने त्या स्थलांतरित होत आहेत. मोबाइल टॉवरमधून निघणाºया रेडिएशनमुळे पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे मुंबईसह दिल्ली आणि बंगळुरूमधील चिमण्या स्थलांतरित होत आहेत.
- डॉ. कर्नल जे. सी. खन्ना, सचिव, पशुवैद्यकीय
रुग्णालय, परळ

चिमण्यांसाठी पोषक असे वातावरण मुंबईत राहिले नाही. जुन्या वस्त्या, कोळीवाडे, गावठाणे, कौलारू घरे आता मुंबईत विरळ होत आहेत. त्यामुळे चिमण्यांना घरटी बांधायला जागा नाही. तसेच त्यांच्यासाठीचे खाद्य नसल्यामुळे चिमण्या मुंबईबाहेर स्थलांतरित होत आहेत.
- सुनिश कुंजु, सचिव, प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी

मुंबई आता चिमण्यांसाठी पोषक राहिली नाही. मुंबईतील चिमण्यांचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. वृक्षतोड, मुंबईचे काँक्रिटीकरण आणि कबुतरांसारख्या मोठ्या आणि बहुसंख्य पक्ष्यांकडून होणाºया अतिक्रमणामुळे लहान पक्ष्यांचे प्रमाण कमी होत आहे. मलबार हिल, कुलाबा आणि जुन्या कोळीवाड्यांच्या भागांत आजही पूर्वीइतक्याच चिमण्या आहेत. चिमण्यांअभावी जैवविविधतेचे नुकसान होत आहे.
- कौस्तुभ दरवेस, मुख्य संरक्षक, ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटी

 

Web Title: These sparrows come back, there is no place for sparrows in Mumbai's growing urbanization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई